मंचर (पुणे) : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला असून सोसायटी गटातून माजी सभापती देवदत्त निकम विजयी झाले आहेत. 18 पैकी 17 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या असल्या तरी निकम यांचा विजय राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आहे. सुरुवातीच्या तीन फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असलेल्या निकम यांनी निरगुडसर मतदान केंद्रावर निर्णयक आघाडी घेतली. विजयी झाल्यानंतर निकम यांच्या अश्रूचा बांध फुटला.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक रंगतदार झाली. माजी सभापती देवदत्त निकम यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बंडखोरी करत स्वतंत्र पॅनल उभा केला. निकम यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीने संपूर्ण ताकद लावली. मात्र निकम यांनी राष्ट्रवादीला धक्का देत विजय संपादन केला आहे. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा डिंभे येथील मतदान केंद्रावरील मतमोजणीत निकम पिछाडीवर होते. 88 पैकी त्यांना केवळ 21 मते मिळाली. घोडेगाव व मंचर या मतदान केंद्रावरील मतमोजणीत निकम यांना चांगली मते मिळाली असली तरी ते आघाडी घेऊ शकले नाही.
निरगुडसर मतदान केंद्राची मतमोजणी सुरू झाली तेव्हा निकम हे 44 मतांनी पिछाडीवर होते. मात्र निरगुडसर केंद्रावर पहिल्याच शंभर मतांमध्ये 80 मते मिळवून निकम यांनी आघाडी घेतली व ती पुढे वाढतच गेली. निकम 379 मते मिळवून विजयी झाले. विजयानंतर मतमोजणी केंद्रातच निकम यांच्या अश्रूचा बांध फुटला.कार्यकर्त्यांच्या गळ्यात पडून ते रडू लागले. दरम्यान बाजार समितीच्या तीन जागा बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या. महाविकास आघाडीचे राजेंद्र मिश्रीलाल भंडारी व लक्ष्मण दत्तात्रय बाणखेले हे व्यापारी आडत मतदारसंघातून, तर हमाल तोलारी मतदारसंघातून सुनील खानदेशे बिनविरोध निवडले गेले आहेत.
पंधरापैकी 14 जागा महाविकास आघाडी पुरस्कृत भीमाशंकर सहकार पॅनलने जिंकल्या आहेत. सोसायटी गटात महाविकास आघाडीचे सचिन हरिभाऊ पानसरे, शिवाजी बाबुराव ढोबळे, रामचंद्र देवराम गावडे, संदीप दत्तात्रेय थोरात, वसंत भागूजी भालेराव, गणेश सूर्यकांत वायाळ, मयुरी नामदेव भोर,रत्ना विकास गाडे, जयसिंग पुंडलिक थोरात, सखाराम धोंडू गभाले तर ग्रामपंचायत मतदार संघात निलेश विलास थोरात,सोमनाथ वसंत काळे ,संदीप भिमाजी चपटे व अरुण शांताराम बांगर यांनी विजय संपादन केला.
भाजपचे तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी चांगली लढत दिली त्यांना ग्रामपंचायत मतदार संघात 333 मते मिळाली. शिवसेना भाजप उमेदवारांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. विजयानंतर देवदत्त निकम यांच्या समर्थकांनी भंडाऱ्याची उधळण करत त्यांची मिरवणूक काढली. राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांची मिरवणूक निघाली. निकम म्हणाले हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे. राष्ट्रवादीतील शेठ, नाना, दादा यांनी मला पाडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना देवदत्त निकम यांना संपवून द्यायचे नव्हते. हे त्यांनी मतदानातून दाखवले आहे.या पुढील काळात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. अशी प्रतिक्रिया देवदत्त निकम यांनी दिली.