मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर परिसरामध्ये ग्रामपंचायत निवडणूक असल्या कारणाने मंचर शहरात चोख बंदोबस्त आहे. या दरम्यान मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, मंचर येथील एसटी बसस्थानकावर एक अज्ञात इसम संशयितरित्या फिरताना आढळला. याबाबत त्यांनी तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक सागर खबाले यांना माहिती दिली. खबाले, पोलीस नाईक नवनाथ नाईकडे, पोलीस जवान पी. एच. मराडे यांनी तत्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जात रात्री नऊच्या सुमारास बसस्थानकाशेजारी असणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहात आडोशाला लपलेल्या संशयित युवकाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने त्याचे नाव श्रीकांत उर्फ पिल्या संदीप राजगुरू असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे त्याच्या एक गावठी कट्टा सापडला. खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी सहायक पोलीस निरीक्षक सागर खबाले, पोलीस नाईक नवनाथ नाईकडे, पोलीस जवान पी. एच. मराडे यांचे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
मंचरला गावठी कट्टासह एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:15 AM