आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रूक व कळंब येथे बिबट्याने मेंढी व ४ पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मजुरही शेतीकामासाठी येत नाही. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी शरद सहकारी बॅकेचे माजी अध्यक्ष सुर्यकांत थोरात यांनी केली आहे.
धरणमळा व कानडेमळा परिसरात मंगळवारी व बुधवारी बिबट्याने हैदोस घातला आहे. मेंढपाळ साळबा हाके यांच्या मेंढ्याच्या वाड्यावर हल्ला करून बिबट्याने मेंढी ठार केली. त्यांचे दहा ते बारा हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच सुर्यकांत थोरात, दशरथ नारायण कानडे, राजेंद्र रामनाथ कानडे, प्रमोद कानडे, बाजीराव शंकर चव्हाण यांच्या पाळीव कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्यांमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. बिबट्याच्या उपद्रवामुळे त्याचा शेती कामावर परिणाम झाला आहे. वनविभाग मात्र गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.