मंचर (पुणे) : विजबिल थकल्याने मंचर उपजिल्हा रुग्णालयाचा वीज पुरवठा महावितरणने दुपारी खंडित केला होता. त्यामुळे अतिदक्षता विभागात उपचार घेणारे रुग्ण, नवजात शिशु व डायलिसिस होणाऱ्या रुग्णांना धोका निर्माण झाला होता. जनरेटर सुरू करून कसेबसे उपचार केले जात होते. यासंदर्भात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न तातडीने उपस्थित केला. त्यानंतर दीड तासात वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.
मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे सुमारे ५२ लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे. यासंदर्भात महावितरणने पत्रव्यवहार केला होता. मार्चअखेर विजबिल भरण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मंचर उपजिल्हा रुग्णालयात आंबेगाव तालुक्याबरोबरच इतर तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. मंगळवारीही रुग्णालयाच्या बाहेर रुग्ण व नातेवाईकांची गर्दी झाली होती. सकाळी बारा वाजून पन्नास मिनिटांनी महावितरणचे अधिकारी आले. त्यांनी विजबिल लवकर भरा असे सांगत उपजिल्हा रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित केला. त्यावेळी अतिदक्षता विभागात चार रुग्ण उपचार घेत होते. तर तीन नवजात शिशु काचेमध्ये ठेवण्यात आले होते. सहा रुग्णांवर डायलिसिस केले जात होते. वीज पुरवठा खंडित झाल्याने या रुग्णांना धोका निर्माण झाला. शिवाय इतर अनेक रुग्ण उपचार घेत होते. त्यांची गैरसोय झाली.
शस्त्रक्रिया थांबल्या गेल्या. वैद्यकीय अधिकारी डॉ. संजयकुमार भवारी व इतर कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित करू नका रुग्णांच्या जीवाला धोका होईल अशी विनंती महावितरणच्या कर्मचाऱ्यांना केली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काहीही न ऐकता ते निघून गेले. यादरम्यान रुग्णांचे नातेवाईक व वैद्यकीय कर्मचारी आक्रमक झाले.
काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू इनामदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक ॲड. अविनाश राहणे, संतोष गावडे, सुरेश आण्णा निघोट, सुरेखा निघोट, सुवर्णा डोंगरे, कमरअली मणियार, राजू सोमवंशी, विजय जाधव, महेश घोडके आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी तेथे आले. यावेळी महावितरणच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना येथे आणून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा आग्रह धरला. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू इनामदार, पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता जयंत गेटमे यांच्याशी संपर्क साधला.सुरुवातीला गेटमे येण्यासाठी तयार नव्हते. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना उपजिल्हा रुग्णात आणले.
त्यावेळी झालेल्या चर्चेत निधी आल्यानंतर 31 मार्चच्या आत वीजबिल भरले जाईल असे डॉ. भवारी यांनी सांगितले. यादरम्यान माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी लगेच विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. मंचर उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये शंभरपेक्षा जास्त क्रिटिकल पेशंट आहेत. वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी एक तासांपासून तेथील वीजपुरवठा खंडित केला आहे. लोक रस्त्यावर आले आहेत. व्हेंटिलेटर, डायलिसिस चालू असताना वीज पुरवठा खंडित झाला आहे. महावितरण वीज पुरवठा जोडणार का व वीज पुरवठा खंडित करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करणार का असा प्रश्न वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पॉईंट ऑफ ऑर्डरमध्ये केला. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी तात्काळ वीज पुरवठा सुरू करू यात कुणी जाणीवपूर्वक चूक केली असेल तर कारवाई करू असे उत्तर दिले. त्यानंतर महावितरणने मंचर उपजिल्हा रुग्णालयाचा वीजपुरवठा पूर्ववत केला. दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची ईडी मार्फत चौकशी करा अशी मागणी यावेळी अविनाश राहणे यांनी केली. तर रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या महावितरण कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू इनामदार यांनी केली.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णालयात अंधार झाला.रुग्णांचे नातेवाईक हवालदील झाले.त्यांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला.एक दिवसाचे बाळ काचेमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्या वडिलांनी जनरेटर बंद झाल्यावर काय होणार असा प्रश्न केला.विशेष म्हणजे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी स्वतः डिझेल आणून हे जनरेटर सुरू ठेवले होते.सुरुवातीला पोलिस अधिकाऱ्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.वैद्यकीय अधिकारी संतप्त झाल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करत महावितरण कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.नातेवाईकांनी अचानक आक्रमक भूमिका घेतल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नमते घेतले.
आज मंचर उपजिल्हा रुग्णालयातील वीजपुरवठा वीजबिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला होता. यामुळे आयसीयू , डायलिसिस विभाग, ऑपरेशन थिएटर, प्रसूती विभाग व हॉस्पिटलमधील इतर विभाग व त्यातील रुग्ण यांचे उपचार ठप्प झाले होते. याची तातडीने कल्पना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिली. वळसे पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सूचना देऊन वीजपुरवठा सुरळीत केला असून वीजबिल भरण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या .