मंचर : चित्रपट अभिनेते गोविंंदा यांनी अचानक व्यासपीठावर येऊन नृत्य करून उपस्थितांना धक्का दिला. क्रेनच्या साहाय्याने व्यासपीठावर येणारे कलाकार क्षणोक्षणी उत्साह वाढवीत होते. मराठी मालिकांमधील नामावंत कलाकारांची हजेरी, विनोद निर्मिती, सात एकर मैदानात प्रेक्षकांनी केलेली गर्दी हे मंचर येथील कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढले. गोवर्धन प्रकल्पाच्या वतीने आयोजित उत्सव आनंदाचा या कार्यक्रमाने मंचरकरांची मने जिंकली.विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त गोवर्धन उद्योग समुहाच्या वतीने हे आयोजन केले होते. शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, प्रितम शहा व शहा परिवाराने या कार्यक्रमाचे नियोजन केले. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. टीव्ही मालिकेतील कलाकार क्रेनद्वारे व्यासपिठावर आले आणि आनंदाचा उत्साह ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली. विनोदी अभिनेता भाउ कदमच्या ट्रॅक्टरमधून एन्ट्रीला प्रेक्षकांनी दाद दिली. वैशाली बसने हिच्या गाण्यावर उपस्थितांनी ठेका धरला. राणा, अंजली, गुरुनाथ, शनया, शितल, आज्या यांनी व्यासपीठावर येवून एकत्रितपणे एक पोरगी, ही पोली साजुक तुपाजली, ओ काका आदी गाण्यावर नृत्य केले. शेतकरी मुलाचे परदेशी मुलीशी लग्न या नाट्याने विनोदाची हवा भरली.कार्यक्रमाचे नियोजन देवेंद्र शहा, प्रितम शहा, प्रिती शहा, नेत्रा शहा, पुजन शहा, अक्षाली शहा यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन चांगले झाले. बैठक व्यवस्था चांगली असल्याने इतकी गर्दी होवूनही कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. बैठकीसाठी स्टेडीअम बनविले होते. प्रेक्षकांना पडद्यावर कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था केली होती. वळसे पाटील यांच्या भाषणाला उपस्थितांनी दाद दिली. देवेंद्र शहा यांनी तालुक्याचे बदललेले स्वरुप विशद केले. वळसे पाटील यांची कन्या पुर्वा वळसे हिने जनतेशी संवाद साधताना केलेले भाषण अनेकांना भावले.निवेदक निलेश साबळे याने आता तुम्हाला सरप्राईज आहे असे सांगितले त्यानंतर सिनेअभिनेता गोविंदा यांचे आगमन अनेकांना धक्का देणारे ठरले. मात्र गोविंदा जेव्हा नृत्य करु लागला तेव्हा अनेकांचा विश्वास बसत नव्हता. गोविंदाने त्याच्या जुन्या गाण्यांवर हटके डान्स केला. साबळे यांना त्याने डान्सच्या स्टेप्स शिकविल्या. गोविंदाने वळसे पाटील यांना शुभेच्छा दिल्या.अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने क्रेनद्वारे धडाकेबाज एन्ट्री केली. तिने नृत्य सादर केले. आनंद शिंंदे व आदर्श शिंंदे यांच्या गाण्यावर उपस्थितांनी ठेका धरला. नवीन पोपट हा, डोकं फिरलंया ही गाणी दाद मिळवून गेली. मानसी नाईकची लावणी, सावनी रवींद्रच्या गायनाला मिळाली. विनोदी मालिकेतील कलाकारांनी ‘बाहुबली’ सादर करुन उपस्थितांना हसायला लावले.
गोविंदाच्या नृत्यावर मंचरकर धुंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 2:03 AM