गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. हा उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिसांनी मंचर शहरातून पथसंचलन केले, तसेच नंदकुमार पेट्रोल पंपाच्या मागे रामनगरी मैदानाचे मोकळ्या जागेत जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम करण्यात आली. यावेळी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया, तसेच जमाव नियंत्रण आदी बाबींची रंगीत तालीम करण्यात आली. मंचर पोलीस ठाण्यापासून पथसंचलनाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, पुणे नाशिक महामार्ग अशा पद्धतीने हे पथसंचलन झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते, तसेच पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन झाले. मंचर पोलीस ठाण्यातील १ पोलीस निरीक्षक, ५ अधिकारी, ३० कर्मचारी, घोडेगाव पोलीस ठाण्यातील १ अधिकारी, ३ कर्मचारी, खेड पोलीस ठाण्यातील १ अधिकारी व १० कर्मचारी, तसेच गणपती उत्सव बंदोबस्तासाठी आलेले २ अधिकारी, ७ कर्मचारी, २ आरसीपी पथक व दहा होमगार्ड यांनी संचलनात सहभाग घेतला. गणेशोत्सवात नागरिकांनी शांतता राखावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी केले आहे.
फोटो : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंचर शहरातून पोलिसांनी पथसंचलन केले, तसेच जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम करण्यात आली.