पुणे : मंडईतील रामेश्वर चौक परिसरात वैमनस्यातून दुचाकीस्वार तरुणावर गोळीबार करून पसार झालेल्या मुख्य आरोपीसह तिघांना गुन्हे शाखेने पकडले. या आरोपींकडून पिस्तूल जप्त करण्यात आले. नाना पेठेत काही महिन्यांपूर्वी अक्षय वल्लाळ या तरुणाचा खून झाला होता. वल्लाळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
रुपेश राजेंद्र जाधव (वय २४, रा. कुंभारवाडा, नाना पेठ), प्रथमेश उर्फ गणेश गोपाळ येमूल (वय २२, रा. नाना पेठ), बाळकृष्ण विष्णू गाजुल (वय २४, रा. नाना पेठ) यांना अटक करण्यात आली. या गोळीबारात शेखर अशोक शिंदे (वय ३२) जखमी झाला आहे.
मंडई भागात दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या दरम्यान दुचाकीस्वार शेखरला अडवून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करत पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली हाेती. गाेळीबार करून पसार झालेल्या आरोपींचा गुन्हे शाखेच्या युनिट एककडून शोध घेण्यात येत होता. आरोपी रुपेश आणि साथीदार प्रथमेश हे कोंढवा भागात थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले, अजय थोरात, अमोल पवार, अनिकेत बाबार, नीलेश साबळे, तुषार माळवदकर यांच्या पथकाने दोघांना अटक केली. त्यांचा साथीदार बाळकृष्ण याला मार्केट यार्ड परिसरात सापळा लावून पकडण्यात आले. या अटक केलेल्या आरोपींकडून पिस्तूल जप्त करण्यात आले.
आरोपींनी अक्षय वल्लाळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. वल्लाळ याचा किशोर शिंदे आणि साथीदारांनी नाना पेठेत खून केला होता. वल्लाळ याचा मावसभाऊ बाळकृष्ण गाजुल याने कट रचून किशोरचा भाऊ शेखर याच्यावर हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले.