अजित गस्ते
पुणे: शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सोमवारी दिवसभरात १८ हजारच्या वर पुणेकरांनी प्रवास करत मेट्रोची सफर केली. स्वारगेट ते शिवाजीनगर प्रवासाला अधिक पसंती दिली. स्वारगेटवरून मंडई, कसबा पेठ ते कोर्ट ते शिवाजीनगर या चार टप्पांचा प्रवास करताना पुणेकरांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. स्वारगेट ते शिवाजीनगर या प्रवासाला अर्धा तास लागत होता. मेट्रोमुळे पुणेकरांनी १० मिनिटांत सुखकर प्रवासाचा आनंद घेतला.
यामुळे उशिरा का होईना स्वारगेटवरून एकदाची मेट्रो सुरू झाल्याने नोकरदार, व्यावसायिक, गृहिणींना दिलासा मिळाला आहे. अंतर्गत भुयारी मेट्रो सुरू झाली, मात्र स्वारगेट मेट्रो स्टेशनचे अद्याप सुरू असलेले काम लवकर पूर्ण करून येथे पार्किंगची व्यवस्था करून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुण्यातील दाट लोकवस्ती असणारा कसबा पेठ, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट हा भाग मेट्रो नेटवर्कमुळे जोडला गेला आहे. यामुळे स्वारगेट ते पीसीएमसी असा प्रवास सोयीचा होणार आहे. पीसीएमसी ते स्वारगेट या प्रवासासाठी ३४ मिनिटे वेळ जाणार असून, त्यासाठी ३५ रुपये भाडे असणार आहे. वनाझ ते रामवाडी या मार्गावरील प्रवाशांना शिवाजीनगर मेट्रो स्थानक येथे इंटरचेंज करून स्वारगेट किंवा पीसीएमसी या दिशेने प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे.
या मार्गिकेतील बुधवार पेठ - कसबा पेठ हे स्थानक लाल महाल, शनिवार वाडा, कसबा गणपती, इलेक्ट्रिक मार्केट यांच्या जवळ असून, त्यामुळे येथे भेट देणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. मंडई स्थानक अत्यंत मध्यवर्ती भागात असून, महात्मा फुले मंडई, तांबट आळी, तुळशीबाग, दगडूशेठ गणपती मंदिर अशा ठिकाणी प्रवाशांना जाणे सहज होणार आहे.
स्वारगेट मेट्रो स्थानक हे एसटी बसस्थानक आणि पीएमपीएमएल बस डेपो यांच्या जवळच बांधण्यात आले आहे. त्यामुळे येथे मल्टीमॉडेल इंटिग्रेशन हब तयार झाले आहे. त्यामुळे एसटी तसेच पीएमपीएल बसने आलेल्या प्रवाशांना शहराच्या दूरवरील भागात जाणे सोयीचे होणार आहे.
असे आहे तिकीट दर...
स्थानके तिकीट दरपिंपरी ते स्वारगेट ३०
वनाझ ते स्वारगेट २५रामवाडी ते स्वारगेट २५
स्वारगेट ते शिवाजीनगर २०
स्वयंचलित जिन्याची वाटतेय भीती
शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्राे सुरू झाली. साहजिकच आपणही मेट्राेप्रवास करावा म्हणून मी सिव्हिल काेर्ट मेट्राे स्टेशनवर पाेहाेचलाे. मेट्राेने प्रवास करत स्वारगेट गाठले; मात्र स्वारगेट मेट्रो स्टेशनवर भुयारी मार्गातून वर येण्यासाठी एस्केलेटर (स्वयंचलित जिना) लावण्यात आले आहेत; या जिन्यावरून तरुण मुले-मुली सर्रास ये-जा करत हाेत्या. मात्र, आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक मात्र येथून जायचे कसे या विवंचनेत पडले हाेते, असे ज्येष्ठ नागरिक सूरज कदम यांनी सांगितले.
या आहेत अडचणी...
- स्वारगेट मेट्रो स्टेशनवर माहिती देण्यासाठी कोणीच नाही.-नटराज हॉटेलसमोरील स्वारगेट मेट्रो स्टेशनचा रस्ता प्रवाशांसाठी अजूनही बंदच.
- स्वारगेट मेट्रो स्टेशनचे आतून सर्व काम पूर्ण झाले असले तरी बाहेर काम बाकी आहे.- स्वारगेट मेट्रोत ऑनलाइन पेमेंट सुविधा आहे. मात्र, रेंज कमतरता असल्याने प्रवाशांना अडचण.
मेट्रोमुळे विकासाला गती मिळाली. पुण्याचा विकास पाहण्यासाठी स्वारगेट ते मंडई प्रवास केला. प्रवास सुखकर होता. मंडईला जाण्यासाठी अवघ्या तीन मिनिटांत प्रवास झाला. येताना देवदर्शनाबरोबर मंडईतून भाजी खेरदी केली. एक्सेलेटरवरून ज्येष्ठांना त्रास सहन करावा लागतो. मात्र, प्रवास चांगला झाला आणि वेळ वाचतो. - प्रकाश कांबळे, सेवानिवृत्त कर्मचारी
शहरातील मध्यवर्ती स्वारगेट स्टेशन येथून मेट्रो सुरू झाल्याने पुणेकर नागरिकांना याचा चांगलाच फायदा होत आहे. यातून प्रवाशांच्या वेळेची बचत होत आहे. यामुळे पुणेकरांनी सोमवारी सकाळपासून ते सायंकाळी ७ पर्यंत १८ हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास करीत प्रतिसाद दिला. यावेळी येणाऱ्या आणि जाणाऱ्या ३६० फेऱ्या झाल्या आहेत. - हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक जनसंपर्क मेट्रो पुणे