पुणे : येत्या २८ फेब्रुवारीअखेरपर्यंत धर्मादाय संस्थांना पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करणे अनिवार्य आहे. शहरात अनेक धर्मादाय संस्था कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत कलम ३१ अ अन्वये ही महत्त्वपूर्ण तरतूद आहे. या अंदाजपत्रकात ट्रस्टला पुढील आर्थिक वर्षामध्ये सर्व स्त्रोतांच्या माध्यमातून अपेक्षित उत्पन्न व प्रस्तावित खर्चांचा आढावा सादर करावा लागतो. ट्रस्टची उद्दिष्टे राबविण्यासाठी खर्चांची आर्थिक तरतूद कशी केली जाणार आहे, हे मुख्यत्वे या बजेटमध्ये दर्शविले गेले पाहिजे. त्याचप्रमाणे ट्रस्टच्या ज्या मालमत्ता असतील त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी केलेली तरतूद या अंदाजपत्रकात केलेली असणे आवश्यक आहे.
नियम १६ अ नुसार अशा धर्मादाय संस्था जेथे नोंदणीकृत असतील त्या स्थानिक धर्मादाय कार्यालयांमध्ये ‘फाॅर्म ७अ’ या नमुन्यामध्येच हे अंदाजपत्रक विश्वस्तांनी सादर करावयाचे असते. पुढील आर्थिक वर्ष सुरू व्हायच्या एक महिना आधी हे अंदाजपत्रक सादर करणे अनिवार्य असते.
———————————-
बजेट सादर महत्त्वाचे
बजेट सादर करणे हे बहुतांश धर्मादाय संस्थाकडून दुर्लक्षित केले जाते. ही एक फार मोठी अनियमितताच आहे. ट्रस्टच्या उद्दिष्टनिहाय खर्चांसाठी आागाऊ आर्थिक नियोजन करणे विश्वस्तांचे कर्तव्य आहे. असे आर्थिक नियोजन केले नसल्यास ट्रस्टच्या कामकाजावर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे घडल्यास विश्वस्त म्हणून अयोग्य काम केल्याचा ठपका संपूर्ण विश्वस्त मंडळावर येऊन ते अपात्र ठरू शकतात.
- ॲड. शिवराज कदम जहागिरदार,
विश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे