पुणे : गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमधील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे रुग्णालयांमार्फत रेमडेसिविर इंजेक्शन्सची मागणीदेखील कमी झाली आहे. यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन्स वाटपात काही बदल करण्यात आले असून, खासगी हाॅस्पिटल्सने लेखी मागणी करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांनी रेमडेसिविर इंजेक्शनबाबत आपली मागणी दैनंदिन स्वरूपात https://tinyurl.com/remdesivirpdh या Google Link वर भरावयाची आहे. या सोबत विहीत नमुन्यातील स्वयंघोषणापत्र देखील सादर करणेचे आहे. लिंकवर दैनंदिन मागणी न भरल्यास संबंधित रुग्णालयाची माहिती नाही, असे समजून सदर रुग्णालयास रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण करता येणार नाही. तरी रुग्णालय प्रशासनाने दररोज दुपारी १२ वाजेपर्यंत लिंकवर रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी अचूकरीत्या नोंदविण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिले आहेत.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यापूर्वी फंक्शनल बेडच्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनच्या उपलब्ध साठ्याचे समन्यायी वाटपाच्या पद्धतीत काही बदल करण्यात आले आहेत.