मांगडेवाडीचा नियोजनबध्द विकास करण्याची गावकऱ्यांची मागणी
दीपक मुनोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मांगडेवाडी गावात मुख्य रस्त्यासह अंतर्गत छोट्या-मोठ्या रस्त्यावर होत असलेली अतिक्रमणे, कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे होत नसल्याने निर्माण झालेली अनारोग्याची परिस्थिती, अशा विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. विलिनीकरणानंतर तरी या समस्यांपासून सुटका व्हावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
सुमारे २५ हजार लोकसंख्या असलेल्या मांगडेवाडी गावचा वार्षिक महसूल दोन कोटी रुपये आहे. त्या माध्यमातून गावात वेगवेगळ्या ठिकाणी विकासकामे सुरु आहेत. तरीही नागरिकांना होणारा जाच कमी झालेला नाही.
गावात साधी सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने जेष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. महापालिकेने सर्वप्रथम ही त्रुटी दूर करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली. गावात विरंगुळा केंद्र, व्यायामशाळा, उद्यान नाही, त्यामुळे आम्ही संध्याकाळी फिरण्यासाठी आणि सकाळी व्यायामाला जायचं कुठे, असा सवाल गावातील तरुणांनी विचारला.
गावाच्या आसपास महाविद्यालयांची सुविधा नसल्याने महाविद्यालयीन तरुणांना भारती विद्यापीठ किंवा शाळेसाठी कात्रजला इतर ठिकाणी जावे लागते. महापालिकेने चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठीही प्रयत्न करावेत, असे काही विद्यार्थ्यांनी नमूद केले. वाढत्या नागरीकरणामुळे मांगडेवाडीला शहराचं रुप येत आहे. मोठी बांधकामे सुरू आहेत. मात्र, त्यातून गाव बकाल होऊ नये याची काळजी महापालिकेने घ्यायला हवी. गावात अतिक्रमण वाढत असल्याने रस्त्यांना जागा कमी पडते, परिणामी वाहतूककोंडीची भीती आहे. अतिरिक्त बांधकामांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
*कोट*
गावात कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीची यंत्रणा आहे, पण घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा नसल्याने अनेक अडचणी येत आहेत.
-आबा मांगडे
कोट
गावात पायाभूत सुविधांची वानवा आहे. जवळच महामार्ग असूनही रोजगाराच्या संधी नसल्याने महापालिकेने मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करायला हवी.
-सागर जाधव, तरुण
फोटो ओळ
गावाच्या मुख्य चौकालगत, महामार्गाच्या बाजूला कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.