पुणे : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याचे पूजन करून हंगामातील पहिली चव चाखण्याची प्रथा आहे; परंतु यंदा बाजारात तयार आंब्याचा तुटवडा असल्याने व मागणी जास्त व आवक कमी असल्याने दरदेखील सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असल्याने पुणेकरांना मुहूर्तावर आंब्याची चवच चाखता आली नाही.हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि तापमानातील प्रचंड चढ-उताराचा फटका यंदा कोकणातील आंबा उत्पादकांना बसला आहे. कोकणातील आंब्याचा पहिला हंगाम जानेवारीमध्येच सुरू होतो. त्यामुळे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर कोकणातील रत्नगिरी, देवगडसह कर्नाटक हापूस बाजारात उपलब्ध असतो; परंतु यंदा येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये आंब्याची आवक तुलनेत खूपच कमी होती. दर वर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मार्केट यार्डमध्ये सुमारे १० ते १५ हजार पेट्या आंब्याची आवक होते; तसेच तयार आंबा देखील मुबलक उपलब्ध असतो. परंतु यंदा केवळ ४ ते ५ हजार पेट्याच कच्च्या आंब्याची रविवारी आवक झाली होती. यामुळे मंगळवार, बुधवार बाजारात नागरिकांना तयार आंबाच मिळाला नाही. त्यात मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने दर देखील प्रचंड वाढले होते. घाऊक बाजारात कच्च्या हापूसच्या चार ते आठ डझनाच्या पेटीला पंधराशे ते साडेतीन हजार रुपये असा दर मिळाला आहे. तर तयार हापूसच्या एका पेटीला दोन ते चार हजार रुपये दर मिळाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.