पुणे : गिनीज बुकच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्यास काही तांत्रिक कारणामुळे असमर्थता दर्शवल्यामुळे महापालिकेच्या विक्रमी ढोलवादनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. प्रशासनाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. आता हा कार्यक्रम पुढील आठवड्यात होणार असल्याचे सांगण्यात आले.रविवारी (दि. २७) हा कार्यक्रम होणार होता. कार्यक्रम सुरू असताना गिनीज बुकचे प्रतिनिधी उपस्थित राहून चित्रीकरण करीत असतात. मात्र त्यांनी त्याबाबत असमर्थता दर्शवली. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. सुरुवातीला कार्यक्रम एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार होता. तिथे सायलेंट झोन असल्याने नकार मिळाला. फर्ग्युसन व कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन करण्यात आले. मात्र जागेअभावी बालेवाडी क्रीडा संकुल निश्चित करण्यात आले, तर आता तिथेही आता अडचण आली आहे.- पुढील आठवड्याची निश्चित वेळ व तारीख मात्र कळवण्यात आलेली नाही. त्याबाबत महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले प्रयत्न करीत आहेत. मोहोळ यांनी सांगितले, की महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बालेवाडी येथील छत्रपती शिवाजीमहाराज क्रीडा संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी गिनीज बुक यांच्याकडे अधिकृतपणे नोंदणीही करण्यात आली आहे.
मनपाचा ढोलवादन विक्रम लांबणीवर, पुढील आठवड्यात होणार उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 4:31 AM