पुणे : डेक्कन येथील महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम बनावट चावीने उघडून फेरफार करून चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या कार्डावरून तब्बल वीस वेळा ट्रांझेक्शन करून ३ लाख १८ हजार रुपये चोरल्याची घटना घडली. शनिवारी (दि.२७) रोजी दुपारी सव्वा चार ते सव्वा सातच्या सुमारास घडली.
बँकेतील महिला ब्रँच मॅनेजरने डेक्कन पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेक्कन येथील गुप्ते हॉस्पिटलसमोर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक आणि बँकेमध्ये एटीएम आहे.
चोरट्यांनी बँकेचे एटीएम बनावट चावीने उघडले आणि मशीनमध्ये फेरफार केला. त्यानंतर ‘एचडीएफसी’च्या दोन वेगवेगळ्या कार्डावरून २० वेळा ट्रांझेक्शन करून बँकेच्या संमतीशिवाय ३ लाख १८ हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहायक पोलिस निरीक्षक वर्षा शिंदे करीत आहेत.