लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गाडी दरवाजा अचानक उघडल्याने दुचाकीवरून जाणारे ज्येष्ठ दाम्पत्य त्याला धडकून जखमी झाले होते. याप्रकरणी ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याबद्दल कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक केली होती. याप्रकरणी आता न्यायालयाच्या आदेशानुसार हर्षवर्धन जाधव व त्यांच्या महिला सहकार्यांचे अपहरण करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते मनीष आनंद यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अमन चड्डा, करण चड्डा, ममता चड्डा, अजय चड्डा, मनीष आनंद (रा. खडकी बाजार) आणि दोन अनोळखी व लोकांच्या गर्दीतील एक जण अशा ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना औंध येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर तसेच औंधमधील एका चौकात १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री साडेआठ दरम्यान घडला. याप्रकरणात हर्षवर्धन जाधव यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनी पुढील चौकात आणखी एका वाहन चालकाला धडक दिल्याने त्यांना जमावाने अडवून मारहाण केली होती. याप्रकरणी जाधव यांना अटक केली होती. मात्र, त्यांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सीआरपीसी १५६(३) नुसार गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश दिला आहे.
याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्या महिला सहकार्यांनी चतु:शृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी यांनी कार पार्क केली असताना कारचा दरवाजा उघडला असताना पाठीमागून अजय चड्डा व ममता चड्डा यांनी धडक देऊन मोठ्याने ओरडून फिर्यादी यांच्या चारित्र्यावर शिवीगाळ केली.
अजय चड्डा यांनी फिर्यादी यांचा विनयभंग करून थोबाडीत मारली. त्यानंतर फिर्यादी व हर्षवर्धन जाधव औंध चौकात गेले असताना त्यांची गाडी अडवून गाडीची चावी जबरदस्तीने काढून घेतली. जाधव यांना खाली खेचून मारहाण करून त्यांच्या डोक्यात राॅडने व काठीने मारा असे म्हणून लोकांच्या गर्दीतून एक अनोळखी माणसाने येऊन फिर्यादी यांना कारमध्ये बसवून अपहरण करून अमन चड्डा, करण चड्डा व मनीष आनंद यांनी लैंगिक अत्याचार करून फिर्यादी यांना रॉड, काठी व इतर शस्त्राने मारहाण करून तसेच जाधव यांना मारहाण करून त्यांचा कुर्त्यामध्ये हात टाकून व पँट काढण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांचा आयफोन तोडून गाडीवर रॉडने मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे.