पुणे : ज्येष्ठ रंगकर्मी, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पुणे शाखेचे माजी अध्यक्ष आणि मनोरंजन संस्थेचे संस्थापक-संचालक मनोहर चिंतामण कुलकर्णी( अण्णा) यांचे गुरुवारी (१६ एप्रिल) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. मनोरंजन संस्थेचे संचालक मोहन कुलकर्णी यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
मनोहर कुलकर्णी यांचा जन्म ३ जानेवारी १९२८ रोजी झाला. सांस्कृतिक क्षेत्राशी नाळ जुळलेल्या कुलकर्णी यांनी १९५० पासून हौशी नटसंघ सरस्वती मंदिर येथे सचिव म्हणून कामास सुरुवात केली. यादरम्यान, त्यांनी पराचा कावळा, म्युनिसीपालटी या नाटकातून भूमिका केल्या. कुलकर्णी यांनी १९५६ पासून श्रीनटराज थिएटर्स या संस्थेचे नाट्य व्यवस्थापनाचे काम स्वीकारले. भावबंधन, देवमाणूस, गुडघ्याला बाशिंग, संशयकल्लोळ, चुकभूल द्यावी घ्यावी अशा नाटकांमधून काम केले. त्यांनी १९६१ पासून नाना रायरीकर यांच्यासमवेत नुमवि मराठी शाळा आणि भावे हायस्कुल पेरूगेट येथे खुले नाट्यगृह चालवण्यास सुरूवात केली. चित्तरंजन कोलहटकर, भालचंद्र पेंढारकर, चारुदत्त सरपोतदार यांच्या सहकार्याने वार्षिक वासंतिक महोत्सवही सुरू केला.
मनोहर कुलकर्णी यांनी डिसेंबर १९७० मध्ये मनोरंजन संस्थेची स्थापना केली. नाटकांना स्टेज, डेकोरेशन साहित्य आणि पडदे पुरवणे, नाट्यगृह आरक्षण, तिकीटविक्री, पोलीस आणि सरकारी परवाने, कलाकारांची व्यवस्था, दौऱ्यांचे आयोजन, मराठी चित्रपट प्रसिद्धी, वितरण व्यवस्था अशा पद्धतीने उत्तम व्यवस्थापकीय संयोजन केले. याशिवाय, उद्याचा संसार, तुझे आहे तुजपाशी, अश्रूंची झाली फुले, लग्नाची बेडी अशा अनेक नाटकांमध्ये हौशी कलाकार म्हणून काम केले. 'जावई माझा भला', 'पांडू हवालदार' या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारल्या.
मनोहर कुलकर्णी यांना मिळालेले पुरस्कार :
१९९२ - नाट्यदर्पण पुरस्कार१९९३ - कलागौरव प्रतिष्ठानचा नाट्यगौरव पुरस्कार१९९६ - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार१९९७ - त्रिदल संस्थेतर्फे दिवाळी गौरव पुरस्कार१९९८ - दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे मनोरंजन निर्मित 'सूर्य पाहिलेला माणूस' या नाटकास सर्वोत्कृष्ट नाट्यनिर्मिती पुरस्कार२००१ - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे राज्य पुरस्कार२००२ - 'उजळल्या दिशा' सर्वोत्कृष्ट नाट्यनिर्मिती पुरस्कार२००७ - मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रकर्मी पुरस्कार२०१७ - पुणे महानगरपालिकेचा बालगंधर्व पुरस्कार