बारामती: कॅन्सर झालेल्या रुग्णास कॅन्सर बरा करतो, असे सांगून बारामती शहरातील एकाची २ लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी मनोहर उर्फ मामा भोसले यास अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश ए. जे. गिऱ्हे यांनी १६ सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शशिकांत खरात (रा. साठेनगर, कसबा, बारामती) यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तक्रारदार खरात यांचे वडलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहर मामा भोसले भोंदूबाबाच्या मौजे सावंतवाडी, गोजुबावी (ता. बारामती) मठामध्ये गेले. त्याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला. तक्रारदार यांच्या वडलांचा गळ्यावरील थायरॉईड कॅन्सर बरा करतो, असे सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिले. तसेच विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत सळ्नमत करून वेळोवेळी चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांचेकडून एकूण २ लाख ५१ हजार ५०० रुपये त्यांचे व त्यांचे वडलांचे जिवाचे बरे व-ईट होईल अशी भीती घालून देण्यास भाग पाडून जबरदस्तीने करत फसवणूक केली. पैसे परत मागीतल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल आहे.
या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी मनोहर मामाला शुक्रवारी(दि १०) सालपे (जि. सातारा) येथे फार्महाऊसवर जाऊन ताब्यात घेतले आहे. उर्वरित दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात आणत त्याला शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली. मनोहर मामा यास शनिवारी (दि. ११) न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या वतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली. तर पोलीस प्रशासनाच्या वतीने २ लाख ५१ हजार रुपये रकमेसह पुण्यात वापरलेली गाडी जप्त करण्यासह अन्य बाबींवर तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली. सरकारी वकील किरण सोनवणे यांनी बाजू मांडली. पोलिसांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश गिऱ्हे यांनी मनोहरमामा यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
—————————————————
...केलेली अटक बेकायदा
मनोहर मामा भोसले याच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणारे वकील विजयसिंह ठोंबरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मनोहर मामा भोसले यांना केलेली अटक बेकायदा आहे. बनावट तक्रारदार उभा करून सदरच्या गुन्ह्याबाबत तीन वर्षानंतर बनावट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील पत्रकार परीिषदेच्या वेळीच आम्ही सांगितले होते, की तुमचा आसाराम बापू करू, अशा धमक्या देत काहीजण खंडणी मागत आहेत. याबाबत पोलीस अधीक्षकांकडे देखील तक्रार केली होती. मात्र, त्याची दखल घेतली नाही. आमच्या तक्रारीची दखल न घेता बनावट तक्रारदार उभा करत बनावट तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा आरोपीचे वकील ठोंबरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
—————————————————
...न्यायालय परिसरात मोठी गर्दी
न्यायालयाबाहेर मनोहर मामा भोसलेला पाहण्यासाठी त्याच्या समर्थक, भक्तांसह उत्सुकतेपोटी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कोणालाही चौकशीशिवाय आवारात प्रवेश दिला जात नव्हता. माध्यम प्रतिनिधींना देखील ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात आला. शनिवारी न्यायालयाला सुट्टी असताना देखील बाहेर गर्दी होती हे विशेष.
—————————————
....पांढराशुभ्र ‘व्हीआयपी’ अवतार बदलला होता
मनोहर मामा भोसले याचे राहणीमान ‘पॉश’ आहे. तो नेहमी पुढाऱ्यांप्रमाणे कडक पांढऱ्याशुभ्र कपड्यांमध्ये वावरतो. शुक्रवारी सालपे येथील फार्महाऊसवर ताब्यात घेऊन बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या वेळी देखील तो पांढऱ्याशुभ्र कपड्यात होता. शनिवारी (दि. ११) न्यायालयात आणतेवेळी त्याचा पांढराशुभ्र ‘व्हीआयपी’ अवतार बदलला होता. आज त्याने साधा टी शर्ट-पँट परिधान केली होती.
फोटोओळी—मनोहर मामा भोसले शनिवारी (दि. ११) सुनावणीनंतर बारामती न्यायालयातून बाहेर पडताना.
११०९२०२१ बारामती—०७
——————————————
फोटोओळी—बारामती न्यायालयात मनोहर मामा भोसले यास हजर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्त होता.
११०९२०२१ बारामती—०६
———————————
फोटोओळी—बारामती न्यायालयाच्या आवारात मनोहर मामा भोसलेला पाहण्यासाठी त्याच्या समर्थकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
११०९२०२१ बारामती—०५
——————————