पुणे : गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे त्यांच्या साधेपणाबाबत परिचित होते; मात्र कर्तव्यकठोर राजकारण्यामध्ये एक गणितप्रेमीही लपला होता, अशी भावना महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेचे निवृत्त संचालक प्रा. जी. सी. कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.मनोहर पर्रीकर यांच्या गणितप्रेमाबद्दल अधिक माहिती देताना कुलकर्णी म्हणाले की, ‘एका वर्षी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेसाठी गोव्यातील २५ विद्यार्थी निवडले गेले होते. गोव्यातील बक्षीस वितरण कार्यक्रमाला मुख्यमंत्री पर्रीकर आले होते. अगदी वेळेत, साधेपणाने व सुरक्षा यंत्रणेचा कोणताही बडेजावपणा न बाळगता ते उपस्थित झाले होते. कार्यक्रम अगदी छोटेखानी होता. मंचावर मी व पर्रीकर असे दोघेच होतो. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच पर्रीकरांनी ‘तुम्ही घेतलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका दाखवा,’ असे सांगितले. मी त्यांना ९ वीची प्रश्नपत्रिका दाखवली. त्यांनी गणिताची प्रश्नपत्रिका कोठे आहे, असे विचारले.मी त्यांना गणिताच्या प्रश्नांचा विभाग दाखविला. त्यातील पहिला प्रश्न वाचून त्यांनी तो अगदी सोपा असल्याचे सांगितले. त्यानंतर माझ्या सांगण्यानुसार त्यांनी पुढील प्रश्न सोडविण्यास सुरुवात केली. पुढील प्रश्न सुटत नसल्याने त्यांनी समोरील विद्यार्थ्यांकडून वही व पेन मागवून घेतले व सोडवू लागले. इकडे त्यांच्या भाषणाची वेळ आल्यावर मी त्यांना बोलण्यास सांगितले. तेव्हा पर्रीकर म्हणाले की, ‘मित्रांनो, तुम्ही सोडवलेले प्रश्न मलाही सोडविता आले नाहीत. तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात, तुम्ही नक्कीच मोठे होणार.’ एवढे झाल्यानंतर त्यांनी मला तुम्ही गोवा प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यास मदत करा, गोवा सरकार सर्व खर्च करेल, असे सांगितले. मी त्यानुसार परीक्षेचे स्वरूप, नियोजन करून दिली. खरोखर राजकारणात असूनही गणितात रमणारा असा राजकारणी विरळाच. त्यांची आठवण या घटनेमुळे राहील, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
गणितात रुची असणारे पर्रीकर : प्रा. कुलकर्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 3:23 AM