पुणे : मराठ्यांनी कधीही कुणाचा द्वेष केला नाही. इतरांना आरक्षण मिळताना माझ्या समाजाने त्यात खोडा घातला नाही. मराठा समाज पहिल्यापासून दानशूर होता. अनेकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मराठा समाजाने मदत केली. प्रत्येकाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, अशी कायम भूमिका ठेवली. मराठा समाजाने स्वतःचे आरक्षण दुसऱ्यांना देऊ केलं. मराठ्यांनी कधीही जातीवाद केला नाही. आज आरक्षणासाठी मराठा समाज वेदना सहन करत आहेत. अनेक नेत्यांना मराठ्यांनी मोठे केले. ज्या नेत्यांना मोठे केले ते आता दूर झाले आहेत, अशी भावना मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली. पुण्यातील खराडी परिसरात मनोज जरांगेंची सभा होत आहे. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. आज मराठ्यांच्या लेकरांकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. इतरांना आरक्षण देताना मराठा समाजाने कधीही विरोध केला नव्हता. पण आता आम्ही आरक्षण मागितले तर का विरोध होत आहे, असा सवाल त्यांनी केला.
आम्ही पोटाला चिमटा घेऊन आमची लेकरं शिकवली. आम्ही जी सोसलं ते आमच्या पोरांच्या निशिबी येऊ नये यासाठी प्रयत्न केले. आमची मुले भविष्यात नोकरीला लागल्यानंतर परिस्थिती सुधारेल असं वाटलं होतं. पण कित्येकदा चांगली मार्क पडूनही आमच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. जर आरक्षण असले असते तर ही परिस्थिती आली नसती, असंही जरांगे पाटील म्हणाले.
आता सरकारला सुटी नाही. आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे. आम्ही कुणाचं घेत नाही आणि आमचं आम्ही मिळवणार यात काहीच शंका नाही. ओबीसींना दिलेले आरक्षण त्यांनी त्यांचे घ्यावे, असंही जरांगे पाटील म्हणाले.