पुणे: छत्रपती शिवाजी महाराज की जय... हर हर महादेव... एक मराठा, लाख मराठा.. अशा घोषणा देत भगवे झेंडे घेऊन लाखो मराठा बांधव मनोज जरांगे पाटलांसोबत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जरांगे पाटलांचा काल पुण्यात प्रवेश झाला. तोच उत्साह, जल्लोष पाटलांवर ती फुलांची उधळण अशा वातावरणात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेल्या रॅलीचे बुधवारी दुपारी पुणे शहरात आगमन होणार आहे.
संचेती हॉस्पिटल जवळील चौकातून औंध च्या दिशेने जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते, विदयार्थी नागरिकांची चौकात गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना क्रेनच्या सहाय्याने शंभर किलोचा हार घालून स्वागत करण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे. चौकात रस्त्याच्या कडेला छोटेखानी स्टेज उभारण्यात आला आहे. तसेच रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांना पिण्याच्या पाणी वाटपाची सोयही केली आहे. सत्कारानंतर त्यांचे भाषण ही होणार असल्याचे पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. याठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.