पुणे : पुणेन्यायालयाकडून मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) दिलासा मिळाला आहे. त्यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आले. मागच्या तारखेला त्यांना आजारपणामुळे उपस्थित राहता आले नाही. आजच्या तारखेला ते कोर्टासमोर (Pune Court) हजर झाले. ते आजारी असल्याने मागील तारखेस येता आले नाही. आज ते डॉक्टरांच्या विरोधात डिस्चार्ज घेऊन रुग्णवाहिकेने कोर्टात उपस्थित राहिले होते. त्यांचा अटक वॉरंट आता रद्द करण्यात आला असून 3 सप्टेंबर ही पुढील तारीख दिली असल्याचे जरांगे पाटलांचे वकील हर्षद निंबाळकर यांनी सांगितले आहे.
न्यायालयामध्ये मनोज जरांगे यांच्या वकिलांनी गेल्या सुनावणीवेळी उपस्थित नसल्याची कारणं यावेळी सांगितली, जरांगे यांचे वकील निंबाळकर म्हणाले, मेहेरबान कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्यावर वॉरंट काढलं होतं. आजच्या तारखेला ते कोर्टासमोर हजर झाले आहेत. मागील तारखेला ते गैरहजर होते. कारण 20 ते 24 तारखेपर्यंत ते आमरण उपोषणाला बसले होते. 23 तारखेला कोर्टात यायची त्यांची परिस्थिती नव्हती. चालण्यासाठी त्यांना त्रास होत होता. तसेच डॉक्टरांनी प्रवास करण्यास मनाई केली होती. म्हणून ते कोर्टात आले नाहीत. मात्र त्यानंतर 31 तारखेला तारीख नसताना ते कोर्टात हजर राहिले होते. म्हणजेच त्यांना कोर्टाबद्धल आदर आहे. आज देखील ते कोर्टात रूग्णवाहिकेत सलाईन लावून आले, कारण त्यांची प्रकृती अजूनही ठीक नाही. डॉक्टरांच्या विरोधात डिस्चार्ज घेऊन ते कोर्टात हजर झाले. यावरून त्यांना कोर्टाविषयी किती आदर आहे, हे दिसते. 3 सप्टेंबर ही पुढील तारीख असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) आंदोलनामुळे पुण्यात कोर्टात हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे २ वेळा हजर राहण्यासाठी समन्स बजावून देखील हजर न झाल्याने कोर्टाने मनोज जरांगे यांच्यावर वॉरंट काढण्यात आलं होतं. 2 ऑगस्टला पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर पार पडणाऱ्या सुनावणीस मनोज जरांगे यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मनोज जरांगे मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास पुण्यात दाखल झाले.
काय आहे प्रकरण?
मनोज जरांगे पाटलांविरोधात वारजे येथील धनंजय घोरपडे यांनी फिर्याद दिली होती. यामध्ये मनोज जरांगे यांच्यासह आणखी दोन जणांची नावे घेण्यात आलेली आहेत. या प्रकरणामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्याचबरोबर कोर्टाने मनोज जरांगे यांना दोन वेळा कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते.