पुणे: एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय जय शिवाजी या घोषणा, फुलांची उधळण अशा जल्लोषात मनोज जरांगे पाटील यांचे पुण्यात स्वागत करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सुरु आहे. पुण्यातील सारसबागपासून जरांगे पाटलांची शांतता रॅली सुरु जाणारा असून डेक्कन येथे या रॅलीचा समारोप होणार आहे. हजारो मराठा बांधव शांतता रॅलीसाठी सारसबागेजवळ जमा झाले आहेत. त्याठिकाणी भावी मुख्यमंत्री असे बॅनर घेऊन फिरणारा युवक लक्षवेधी ठरला आहे.
रॅलीत सहभागी झालेल्या मराठा बांधवांना या बॅनरबाबत विचारले असता त्यांनी जरांगे पाटील मुख्यमंत्री व्हावेत अशी मराठा समाजाची इच्छा असल्याचे सांगितले आहे. जरांगे पाटलांच्या रॅलीत राज्यभरातून मराठा बांधव, भगिनी सहभागी झाल्या आहेत. विशेष म्हणजे महिलांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. जरांगे पाटील आम्हाला नक्कीच आरक्षण मिळवून देतील असा विश्वास महिलांनी व्यक्त केलाय. आमच्या मुलांना शिक्षण पूर्ण होऊनही नोकरी मिळत नाही. ते सध्या बेरोजगार आहेत. आरक्षण मिळाले तर त्यांना नोकरीही मिळेल. यासाठी पाटील लढत आहेत. आम्ही संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांच्यामुळे नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळेल असे महिलांनी सांगितले आहे.
माझा जीव गेला तरी मी मागे हटणार नाही - जरांगे पाटील
महाराष्ट्रात मराठे एक नाहीत असे ज्यांनी हीनवले त्यांना पुणेकरांनी दाखवून दिले त्यांची पाठ थोपटायला हवी. दोन चार दिवसापूर्वी आपल्या समाजाला खूप हिनवलं पण पुणेकरांनी एकजूट दाखवून दिली. आरक्षण मिळे पर्यंत मला साथ द्या मागे हटू नका मी हटत नाही अशीच एकजूट दाखवा. मला यांनी घेरायचं ठरवलं आहे. पण छाताडावर पाय ठेऊन पुढे जाऊ. मुंबईतल्या बऱ्याच जणांना माज आला आलाय तो माज उतरवयाचे औषध मराठ्यांजवळ आहे. महाराष्ट्रातले जेवढे जेवढे माजलेले वळू आहेत त्यांना कात्रजचा घाट दाखवू, तुमची लेकरं मोठी व्हावीत एवढीच माझी इच्छा आहे. माझा जीव गेला तरी मी मागे हटणार नसल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.