लोणावळा (पुणे) : आम्ही मुंबईत येण्यापूर्वी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढावा. आम्ही चर्चेला तयार आहोत; मात्र चर्चा करण्यासाठी या तिघांनी यावं. इतर कोणाला पाठवू नये, मराठा समाजाचा एकही तरुण तुम्हाला काही बोलणार नाही, त्याचा शब्द मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री देतो, मराठा समाजाला आरक्षण ‘ओबीसी’मधूनच हवंय, अशी ठाम भूमिका मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी वाकसईचाळ येथील सभेत गुरुवारी व्यक्त मांडली.
पोलिस प्रशासनाने मुंबईतील आझाद व शिवाजी मैदान मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास नाकारले आहे. वाकसईचाळ येथील सभेत जरांगे-पाटील म्हणाले, आम्ही शांततेत उपोषण करायला चाललो आहे. कारण, आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आझाद मैदानात शांततेत आमरण उपोषण करणार आहे. आम्हाला कायदा व संविधानाने तो अधिकार दिला आहे. मी उपोषण हे आझाद मैदानावरच करणार आहे. मराठा समाजाचे आंदोलन हे शांततेच्या मार्गाने होणार आहे. मुंबईत कोणतीही गडबड, गोंधळ होणार नाही, याचा शब्द मी समाजाच्या वतीने देतो; मात्र आमची व मुंबईकरांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी शासनाने घ्यावी. आम्ही मुंबईत येण्यापूर्वी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढावा. आम्ही चर्चेला तयार आहोत; मात्र चर्चा करण्यासाठी या तिघांनी यावं. इतर कोणाला पाठवू नये, मराठा समाजाचा एकही तरुण तुम्हाला काही बोलणार नाही. त्याचा शब्द मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना देतो.
आरक्षण हवं आहे ते तुम्ही कुठेही द्या
मनोज जरांगे-पाटील म्हणाले, आम्हाला आरक्षण हवं आहे. ते तुम्ही कुठेही द्या. लोणावळ्यात द्या, वाशीमध्ये द्या, मुंबईमध्ये द्या किंवा अजून कुठे द्या; पण आम्हाला आरक्षण द्या व तेसुद्धा ‘ओबीसी’मधूनच द्या. इथून तिथून ते देऊ नका. ते आम्हाला मान्य नाही. ज्या ५४ लाख नागरिकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना व त्यांचे सगेसोयरे, गणगोत, सगेसोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. या आमच्या मागण्यांवर आम्ही ठाम असून, शासनाने त्या मागण्या मान्य कराव्यात.
मराठे जेव्हा-जेव्हा लढले तेव्हा इतिहास घडला
जरांगे-पाटील म्हणाले, मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मागील ७० वर्षे निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हता, आता मात्र समाजाच्या शांततेच्या आंदोलनामुळे तो अंतिम टप्प्यात आला आहे. मराठे जेव्हा-जेव्हा लढले तेव्हा इतिहास घडला. आता देखील मराठे शांततेत आले व शांततेमध्ये आरक्षण घेऊन गेले हा दुसरा इतिहास आपल्याला घडवायचा आहे. याकरिता मुंबईत गेल्यावर कोणीही शिस्तीचे उल्लंघन करणार नाही. प्रत्येकाने स्वयंसेवकाची भूमिका पार पाडत एक दुसऱ्याला मदत करायची, गाड्या एकामागे एकच ठेवायच्या.