पुणे : आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रॅलीला समर्थन देण्यासाठी शहरातील विविध महाविद्यालयांत शिक्षण घेणारे, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मराठा समाजातील विद्यार्थी मोठ्या संख्येने संचेती हॉस्पिटल चौक येथे जमा झाले होते. ‘एकच मिशन मराठा आरक्षण’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही’, अशा घोषणा विद्यार्थी देत होते. तसेच सरकारने मराठा आरक्षणाचा सकारात्मक विचार करून गरीब घटकातील मराठा कुटुंबांना शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण दिले पाहिजे, अशा भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.
आकांक्षा मोहिते (कोल्हापूर) सध्या सीओईपीमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. ती म्हणाली, मराठा समाजातही गरीब कुटुंबांची संख्या मोठी आहे. अनेकदा जास्त गुण घेऊनही शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. पैसा नसल्याने खासगी कॉलेजमध्ये शिक्षण परवडत नाही. त्यात गरीब घटकांतील मुलांना शिक्षणासाठी असंख्य अडचणी येतात.
मॉडर्न कॉलेजमध्ये बी.एस्सी. स्टॅटिस्टिक्स पदवी घेणारा क्षुधांत पाटील (मूळ रा. चाळीसगाव) म्हणाला, कॉलेज सुरू असल्याने आम्ही थेट रॅलीत सहभागी होऊ शकत नाही. मात्र, आम्ही शहरातील विविध कॉलेजचे विद्यार्थी जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी आलो आहोत. माझ्या जन्मापासून मराठा आरक्षणासंदर्भात मी ऐकत आलोय, अनेक आंदोलने झाली, मोर्चे झाले. मात्र, अनेक वर्षे झाली तरी आरक्षण नाही मिळाले. आता तरी सरकारने सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे.
अत्यंत ताकदीने आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. चाळीस टक्क्यांमधील केवळ ६-७ टक्के मराठा समाज श्रीमंत असल्याने सर्व समाज श्रीमंत असल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. बहुसंख्य मराठा समाज शेतकरी असून, गाव खेड्यात गरिबीत कष्ट करून जीवन जगत आहे. त्यामुळे त्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. राजकीय नको, पण शैक्षणिक आरक्षण तर नक्की दिले पाहिजे, असे सीओईपीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेणारा अथर्व काळे (अहमदनगर) याने सांगितले.