पुणे/पिंपरी : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रविवार, दि. ११ ऑगस्ट रोजी मराठा जनजागृती व शांतता फेरी होणार आहे.
पुणे शहरात सकाळी ११ वाजता फेरीला सुरुवात होईल. स्वारगेट येथील सारसबाग-बाजीराव रोड, आप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, छत्रपती शिवाजी महाराज पूल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर चौक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन (अलका टॉकीज) या मार्गाने जाईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवडमधून निघणारी फेरी निगडीतील भक्ती-शक्ती चौक या ठिकाणाहून सुरू होईल. यामध्ये देहूरोड, मावळ या भागातून येणारे मराठा बांधव भक्ती-शक्ती येथे सहभागी होतील. काळेवाडी, रहाटणी भागातील मराठा बांधव पिंपरी चौकात सहभागी होतील. खेड, जुन्नर व चाकण या भागातून येणारे बांधव नाशिक फाटा येथे सहभागी होतील. फेरी एकत्रितपणे भक्ती-शक्ती चौकातून सकाळी नऊ वाजता निघेल. ९.१५ वाजता पिंपरी चौकात आणि ९.३० वाजता नाशिकफाटा येथे पोहोचेल. त्यानंतर पुण्यातील सारसबागच्या दिशेने वाटचाल करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.