बारामती: मराठा आरक्षणासाठी लाक्षणिक उपोषण करून मराठा आरक्षासाठी एल्गार पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी (दि २०) बारामतीत सभा होणार आहे .राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात बारामती शहरातील तीन हत्ती चौक याठिकाणी त्यांची त्यांची जाहीर सभा होणार आहे. आता जरांगे पाटील यांची तोफ बारामतीत धडाडणार असून या सभेची जय्यत तयारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या गावी अंतरावली सराटी याठिकाणी आमरण उपोषण करून राज्य शासनाला घाम फोडला होता. त्यांच्या या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. नुकत्याच अंतरावली सराटी याठिकाणी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. मनोज जरांगे हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये चर्चेत आले आहेत. मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी जरांगे यांनी सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, आपण २४ ऑक्टोबर नंतर एक मिनिट देखील थांबणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. अंतरावली सराटी येथील सभेनंतर जरांगे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यात सभा होणार आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या बारामती शहरात तीन हत्ती चौक याठिकाणी दि २० ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता सभा होणार आहे.
बारामती मधील जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. त्या ठिकाणी तब्बल १०० एकर जागा या सभेसाठी निश्चित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी सभा राजगुरुनगरला होणार असली तरी जरांगे पाटील यांच्या बारामती येथील सभेची अधिक उत्सुकता आहे. बारामती शहरात होणाऱ्या सभेसाठी लगत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागातून मराठा समाज बांधव बांधव मोठ्या संख्येने येणार आहे. या सभेसाठी जागा कमी पडण्याची शक्यता आहे.