कोरेगाव भीमा (पुणे) : मराठ्यांच्या मुलाच्या हिताच्या लढाईत जीवही गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही हा तुळापूर येथील शंभूराजांच्या शौर्यपीठावरून शब्द आहे. ज्यांना आपल्या बापजाद्यांनी मोठे केले तेच आज आपल्या विरोधात उभे राहिले असूनही राज्यातील मराठा समाज करोडोने एकत्र आला असल्याचे विरोधकांचे षडयंत्र मोडीत निघत असल्याचे मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले.
राज्यात मराठा आरक्षणासाठीमनोज जरांगे-पाटील यांनी श्री क्षेत्र तुळापूर येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या शौर्यपीठ स्थळी मनोज जरांगे-पाटील नतमस्तक होत शंभूराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी पुणे जिल्ह्यातील झंझावाती दौऱ्यास सुरुवात केली. यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी उपस्थित राहून मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा दर्शविला.
मनोज जरांगे-पाटील म्हणाले, रायगड व वढू-तुळापूरच्या पवित्र भूमीवर नतमस्तक होत शिवशंभूछत्रपतींचा आशीर्वाद घेत मराठा समाजावरील गेल्या ७० वर्षांवरील अन्यायाविरुद्ध लढा मायबाप जनतेच्या आशीर्वादासह सुरू केला आहे. मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी लढायच असून, आपल्यावरील अन्याय बंद करायचा आहे. आपण ७० टक्के लढाई आपण जिंकली असून, महाराष्ट्रात २९ लाख नोंदी सापडल्या आहेत. आरक्षण ७० वर्षांपूर्वी आरक्षण असते तर जगात सर्वात प्रगत मराठा समाज झाला असता त्यामुळे आतातरी आपल्यात मतभेद आणू नका, आरक्षण मिळेपर्यंत कोणाचंही ऐकू नका, आपल्या मुलांच्या हितासाठी लढायचं आहे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी तुळापूर ग्रामस्थ व सकल मराठा समाजाच्या वतीने फटाके, रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालून जंगी स्वागत करीत जरांगे-पाटील यांचा तुळापूर ग्रामस्थांच्या वतीने शंभूराजांच्या पूर्णाकृती पुतळा भेट दिला. यावेळी फुलगाव, लोणीकंद येथेही स्वागत करण्यात आले. यावेळी लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
तोच म्हणतोय आरक्षण मिळवू देणार नाही
आपल्याला राजकारण करायचे नाही कारण आजपर्यंत आपण खूप झेंडे उचलले, ज्यांना मोठे केले ते मागे राहायला तयार नाही, आपल्या मागे कोणी नाही, हे लक्ष्यात आले अन् ज्याला मोठा केला तोच म्हणतोय मी आरक्षण मिळवू देणार नाही असे सांगत मी शांत आहे; पण माझ्या वाटेला गेलो तर सोडत नाही असा इशाराही मनोज जरांगे-पाटील यांनी यावेळी दिला.