लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोणंद येथील ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाला साखर कारखान्यांकडून मनुष्यबळ पुरवले जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पाची कुशल कामगारांची गरज पूर्ण होऊन त्यांची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यासाठी लोणंदचा प्रकल्प व कारखाने यांची सांगड घालून दिली. ऑक्सिजन प्रकल्पात टर्नर व फिटर यांची मोठ्या प्रमाणावर गरज असते. साखर कारखान्यांमध्येही या कामात कुशल असणारे कामगार लागतात. सध्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. त्यामुळे या कामगारांना विशेष काम नाही.
लोणंदमधील ऑक्सिजन प्रकल्पातील या प्रकारचे कौशल्य असणाऱ्या कामगारांची संख्या कोरोना तसेच काहींच्या परगावी जाण्यामुळे कमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. ऑक्सिजनची सध्या प्रचंड गरज निर्माण झाल्याने या प्रकल्पांवर ताण आला आहे. त्यासंबधीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेत कामगार कमी झाल्याची बाब पुढे आली व आयुक्त गायकवाड यांनी यावर हा उपाय सुचवला. त्यामुळे आता काही साखर कारखान्यांमधील टर्नर व फिटर पदावरचे कामगार ऑक्सिजन प्रकल्पांना देण्यात येणार आहेत. लोणंद प्रकल्पापासून त्याची सुरुवात होणार आहे.