पुणे : महापालिकेचे अधीक्षक अभियंते श्रीनिवास कंदूल यांच्या कडील मध्यवर्ती भांडार विभागाचे खरेदीचे सर्व अधिकार शनिवारी तडकाफडकी काढण्यात आले. दरम्यान, ही बाब प्रशासकीय बदलीची असल्याचे सांगण्यात येत असले, तरी माध्यमिक विभागाच्या गणवेश खरेदी वरून स्थायी समितीच्या मागील दोन बैठकांमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून हे अधिकार काढण्यात आल्याची चर्चा महापालिकेत आहे. या वादग्रस्त वक्तव्याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले होते. कंदूल यांचा पदभार उपायुक्त आणि दक्षता विभागाचे प्रमख उदय टेकाळे यांच्याकडे दिला आहे, तर कंदूल यांच्याकडे मलनिस्सारण केंद्राची देखभाल दुरुस्ती असणार आहे. अधीक्षक अभियंता (विद्युत) हे पद असलेल्या कंदूल यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभागाचा कारभार २०१२ पासून होता. या विभागाच्या माध्यमातून महापालिकेसाठी करण्यात येणारी सर्व प्रकारची खरेदी करण्यात येते. त्यात कर्मचाऱ्यांच्या गणवेशा पासून कचरा बकेटपर्यंतची सर्व खरेदी येते, तर मागील वर्षापासून शिक्षण मंडळाच्या साहित्य खरेदीची जबाबदारीही कंदूल यांच्याकडेच देण्यात आली होती. मागील महिन्यात स्थायी समितीमध्ये कंदूल यांच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडून महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आयत्यावेळी मान्यतेसाठी दाखल केला होता. त्या वेळी स्थायी समिती अध्यक्षांशी बोलताना, त्यांच्याकडून अनावधानाने काही अनावश्यक शब्द वापरले गेले होते. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष आणि सदस्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतरच्या बैठकीतही या गणवेश खरेदीवरून महापालिका प्रशासनात असलेले मतभेद समोर आले होते, तर काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या साबण खरेदीवरूनही त्यांच्या विभागावर टीका झालेली होती. हे प्रकरणच कंदूल यांना भोवले असल्याची महापालिकेत चर्चा आहे.
कंदूल यांच्या अधिकारावर गदा
By admin | Published: May 03, 2015 5:59 AM