यशवंतराव चव्हाण सांगत, “मतभेद असणं लोकशाही जिवंत असण्याचं लक्षण आहे. पण मतभेदानं मनभेदाचं आणि मनभेदानं विद्वेषाचं रूप घेतलं की लोकशाहीतलं मांगल्य हरवून बसतं.” महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीतला एक प्रसंग आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या एका बड्या कॉंग्रेस नेत्याने जाहीर भाषणात ‘शेठजी-भटजी’ असा शब्दप्रयोग करून काही कोट्या केल्या. याबद्दल पुढचे कित्येक महिने नाईकसाहेब पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात या शब्दप्रयोगाबद्दल दिलगिरी व्यक्त करत राहिले.
ज्या बाबासाहेब भोसले यांच्या उदाहरणाने सुरुवात केली त्यांचीच आणखी एक आठवण. मुख्यमंत्री राहिलेल्या भोसले यांना तीन मुलं. पण यातलं कोणीच राजकारणात कसं नाही, अशी विचारणा ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर गोखले यांनी त्यांना केली. भोसले यांनी उत्तर दिलं, “राजकारणात जाण्यासाठी तीन गुण अंगी लागतात. ते म्हणजे ‘लठ्ठ’, ‘मठ्ठ’ आणि ‘निगरगट्ट’. माझ्या तिन्ही मुलांमध्ये हे तिन्ही गुण नसल्यानं राजकारणात कोणीच नाही.” यात तथ्य किती हे ज्यानं-त्यानं ठरवावं. बॅॅरिस्टर भोसलेंचे शब्द भलेही टोचणारे असतील. पण सर्वसामान्यांवर दादागिरी करणारे, हिंसा करणारे ‘गुंड’ लोकप्रतिनिधी आजुबाजूला नाहीत काय? स्वार्थासाठी, लोकहिताचा बळी देणारे ‘षंढ’ लोकप्रतिनिधी जिथंतिथं दिसतातच ना? ज्ञान, भान, भाषा, समज, वर्तन, गुणवत्ता, तारतम्य आणि यातून उभ्या राहणाऱ्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत किती राजकारणात?