भूगाव - पुण्यातील कमिन्स इंडिया फाऊंडेशन, गोविज्ञान संशोधन संस्था, क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच, स्वच्छ सेवा सहकारी संस्था, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जीवन संवर्धन फाउंडेशन, सर्वज्ञ विकास प्रबोधीनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिरंगुट येथील साप्ताहिक मिलन, आबासाहेब शेळके मित्रमंडळ व भूगाव, भूकुम, पिरंगुट, कासारआंबोली, शिवणे येथील ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती उत्सवकाळात सुमारे ३५० टन निर्माल्य गोळा केले आहे. या निर्माल्याचे कंपोस्ट खत तयार करण्याचे काम चालू असून याचे वितरण शेतकऱ्यांना केले जाणार आहे.स्वच्छ सेवा सहकारी संस्थेने पुणे महानगरपालिकेतील चौदा घाटांवर, गोविज्ञान संशोधन संस्थेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पाच, मुळशी तालुक्यातील पाच व शिवणेतील दोन घाटावर असे एकूण २६ घाटांवर निर्माल्य संकलनाचे काम केले.या उपक्रमासाठी कमिन्सचे सौमित्र मेहरोत्रा, अवंती कदम, संदीप क्षीरसागर, प्रशांत चितळे, अनिल कुलकर्णी, सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त उमेश माळी, गोविज्ञान संशोधन संस्थेचे अनिल व्यास, आनंद पाठक, प्रतिष पारखी, राजेंद्र लुंकड, प्रदीप पाटील, अशोक वाळके, स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे प्रिया कचोरिया यांचे विशेष सहकार्य लाभले.कमिन्स इंडिया फाऊंडेशनचे सुमारे ५०० अधिकारी व कर्मचारी या २६ घाटांवर स्वत: पाचव्या व अकराव्या दिवशी थांबून लोकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच निर्माल्यदान करण्याचे आवाहन लोकांना करीत होते.कोथरुड परिसरात रॅली काढून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.या निर्माल्य प्रकल्पासाठी लागणारा सर्व खर्च कमिन्स इंडिया फाऊंडेशन करीत आहे, अशी माहिती कमिन्सचे प्रकल्प समन्वयक संदीप क्षीरसागर यांनी दिली.पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा पाठपुरावानिर्माल्यापासून खत तयार करण्याचे संपूर्ण काम गोविज्ञान संशोधन संस्थेमार्फत केले जाते. मागील वर्षी यांच घाटांवर सुमारे २२० टन निर्माल्य संकलित करून यापासून ११० टन कंपोस्ट खत तयार केले घेले. यावर्षी यांत वाढ होऊन सुमारे ३५० टन निर्माल्य संकलित करून यापासून १७५ टन कंपोस्ट खत तयार होईल.खत तयार करण्यासाठी भारतीय गाईचे शेण व मूत्र वापरल्याने मागील वर्षी या खताची लॅबमध्ये तपासणी केली असता यांत २७% एवढ्या उच्च प्रमाणात सेंद्रिय कार्बन आढळून आला. गोविज्ञान संशोधन संस्थेमार्फत पुण्यातील ४५ मोठ्या सोसायट्यांमध्येही जागृतीचे काम केले गेले. त्यांना घरगुती व मंडळाच्या गणपतीच्या वेळी जमा झालेल्या निर्माल्यासाठी पिशव्या देण्यात आल्या होत्या.येथून सुमारे २.५ टन निर्माल्य संकलित झाले. तसेच पाच शाळांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. निर्माल्यापासून तयार झालेले कंपोस्ट खत, तसेच जमा झालेल्या फळांपासून पिकांसाठी संजीवनी अर्क तयार करण्यात येत आहे व नारळांपासून रोपवाटिका केली जाणार आहे.परिसरातील शेतकºयांसाठी ‘गोआधारित शेती’ या विषयावर व खत कसे वापरावे, या विषयावर मार्गदर्शन शिबिर घेऊन त्यांना मोफत या गोष्टी वाटण्यात येणार आहेत. तसेच सहभागी सोसायट्यांमध्येही खतवाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती गोविज्ञान संशोधन संस्थेचे अनिल व्यास यांनी दिली.क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचामार्फत गणेशोत्सवाच्या महिनाभर अगोदर भावी पिढीमध्ये पर्यावरणाबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. यांतून परिसरात विविध शाळांत मार्गदर्शन शिबिरे, रॅली, स्पर्धांमधून जनजागृती करण्यात आली. तसेच पर्यावरणपूरक मूर्ती करण्याचे प्रशिक्षण मुलांना दिले.
३५० टन निर्माल्याचे होणार खत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 2:57 AM