पुणे : पुणे शहरात या वर्षी आतापर्यंत तब्बल ११०० जण बेपत्ता झाले असून त्यापैकी ७०४ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. बेपत्ता व्यक्तींचा स्थानिक पोलीस ठाण्यातून तपास केला जात असला तरी त्याच्या तपासावर पोलीस आयुक्तालयातून पाठपुरावा केला जातो. प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांना तब्बल ३३ दिवसांनंतर शोधण्यात पुणे पोलिसांना यश आले. यासाठी पुणे पोलिसांनी खुप प्रयत्न केले. स्वत: हून निघून गेलेली व्यक्ती उद्योजक असल्यामुळे पोलिसांनी इतके पोलीस बळ लावले होते. त्यांची कामगिरी वाखाणण्यायोगी असली तर इतर सामान्य व्यक्ती हरविली तर पोलीस इतका प्रयत्न करीत का असा प्रश्न त्यानिमित्याने उपस्थित केला जाऊ लागला होता.
याबाबत पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी सांगितले की, पाषाणकर यांनी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ते गेले होते. त्यावेळी व्यावसायिक कारणावरुन त्यांचे अपहरण झाले का अथवा त्या कारणावरुन ते निघून गेले असावेत अशी शंका तक्रारीमध्ये व्यक्त केली होती. त्यामुळे पोलिसांनी आपल्यापरीने सर्व तो प्रयत्न करुन त्यांचा शोध लावला. १८ वर्षाखालील व्यक्ती जर घर सोडून गेली तर पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल करुन त्याचा तपास करतात. सर्वसाधारण मिसिंगच्या तक्रारीत घरातील तात्कालिक कारण असते. त्याचा तपास स्थानिक पोलीस ठाण्यांमार्फत केला जातो. त्यांना तपासासाठी तांत्रिक सहाय्य सामाजिक सुरक्षा विभागाकडून देण्यात येते.
मिसिंगच्या तक्रारीचे पुढे काय झाले, यासाठी आयुक्तालयात स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने जुन्या केसेसचा तपास करुन अनेक लोकांना शोधून त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली केले आहे. अनेकदा हरविलेली व्यक्ती काही काळाने परत येते. परंतु, घरचे लोक ही बाब पोलिसांना कळवत नाही. अशीही अनेक प्रकरणे आढळून आली आहेत. व्यक्ती व्यक्तीच्या तपासात पोलिसांकडून भेदभाव केला जात नाही. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यावर जबाबदारी देण्यात आलेली असते. त्यांना सामाजिक सुरक्षा विभागातून तांत्रिक सहाय्य केले जाते. मिसिंग तक्रारीबाबत काय तपास झाला. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी एक स्वतंत्र टीम नेमण्यात आली आहे. बच्चनसिंह, पोलीस उपायुक्त, पुणे शहर