पुणे : महापालिकेच्या हद्दीबाहेरील, तसेच जिल्ह्याबाहेरील कोरोना रुग्णांचे पुण्यात येऊन उपचार घेण्याचे प्रमाण तब्बल ३५-४० टक्के आहे. एकट्या जम्बो कोविड सेंटरमध्ये गेल्या महिनाभरात पालिकेच्या हद्दीबाहेरील ६५० रुग्णांनी उपचार घेतले आहेत. या रुग्णांवर पालिकेलाच खर्च करावा लागत असून स्थानिक आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडला आहे.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुण्यात कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली. साधारणपणे मार्च आणि एप्रिल महिना पुणेकरांसाठी धोकादायक ठरला. या काळात रुग्णालयात खाटा मिळते अत्यंत अवघड झाले होते. पालिकेच्या जम्बो रुग्णालयासह बाणेर येथील कोविड रुग्णालय, लायगुडे, दळवी, नायडूसह पालिकेची विविध रुग्णालये अल्पावधीत रुग्णांनी भरून गेली. शासकीय यंत्रणांवरही ताण आला.
शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांमधील ऑक्सिजन व व्हेंटिलेटर खाटा वाढविण्यावर भर देण्यात आला. याच काळात पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण भागात रुग्ण वाढत गेले. स्थानिक यंत्रणा अपुरी पडत गेली. त्यामुळे या भागातून पुण्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण येऊ लागले. यावसबतच अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमधूनही कोरोना रुग्ण पुण्यात खासगी आणि पालिकेच्या दवाखान्यात उपचारासाठी येऊ लागले.
--
जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू केल्यापासून २३ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत एकूण २ हजार २५० रुग्ण दाखल झाले. त्यापैकी १ हजार ६०० रुग्ण महापालिकेच्या हद्दीतील आहेत. तर पिंपरी चिंचवड १००, पुणे ग्रामीण २०० तर परजिल्ह्यातील ३५० रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
-----
एक रुग्ण सरासरी दहा ते बारा दिवस उपचार घेतो. एका रुग्णावर दिवसाला सरासरी ६ ते ७ हजार रुपये खर्च होतो. परजिल्ह्यातील रुग्णांच्या खर्चाचा आर्थिक भार पालिकेवर पडत आहे. परंतु, नागरिक कोणत्या भागातला आहे याचा विचार आम्ही करीत नाही. त्याचे प्राण वाचणे अधिक महत्त्वाचे असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
-----
२३ मार्च ते २३ एप्रिल जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णसंख्या
पुणे शहर - १६००
पिंपरी-चिंचवड-१००
पुणे ग्रामीण - २००
पुणे जिल्ह्याबाहेरील - ३५०
एकूण - २२५०