बारामती : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी देखील विजयासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता असतानाच पुणे जिल्ह्यातील व बारामती तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत मात्र आश्चर्यकारक घटना घडली आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील तब्बल एकाचवेळी ७६ जणांनी ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये येथील ग्रामपंचायत आणि साखर कारखाना निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळते.अलीकडेच भाजपच्या ताब्यात असणारा माळेगाव साखर कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून आणला आहे. त्यानंतर सर्वांचेच लक्ष ग्रामपंचायतीकडे होते. मात्र ही अपेक्षा फोल ठरली.
त्यामागचं कारण म्हणजे माळेगाव येथे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ७६ जणांनी निवडणुकीचे अर्ज मागे घेतले. कारण आता माळेगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये होणार असल्याने सर्व पक्षांनी एकत्र येत याबाबत निर्णय घेतला.
ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शासनाने या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर होणार असल्याचे जाहीर केले. याबाबत नगरविकास सचिव संजय मोघे यांनी विनंतीपत्र पाठविले होते. मात्र सध्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये या निवडणुकीचा देखील समावेश होता. तसेच शासनाने या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर होणार असल्याने ३ महिने निवडणूक पुढे ढकलण्याची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. मात्र तांत्रिक दृष्ट्या, नियमानुसार आयोगाला निवडणूक रद्द करता आली नाही. अवघ्या दोन महिन्यांसाठी निवडणूक लढविणे, त्यासाठीचा खर्च कोणत्याच पक्षाला आणि उमेदवाराला परवडणारा नाही. या पार्श्वभूमीवर गावातील नेते मंडळींनी निर्णायक भूमिका घेतली. त्यानुसार १७ जागांसाठी दाखल करण्यात आलेल्या ७६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
सोमवारी (दि. ४) ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, माजी अध्यक्ष रंजन तावरे, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे, विक्रमसिंह जाधवराव, दिलीप तावरे, रणजित तावरे, जयदीप तावरे, प्रशांत मोरे, अशोक सस्ते आदी पदाधिकाºयांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांसाठी होणारी दमछाक टळली आहे. सध्या दोन्ही पक्षांनी राजकीय तलवारी म्यान केल्याचे चित्र आहे. मात्र नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात येथील निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे संकेत आहेत. ————