अनेक प्रकरणे समोर येतायेत; शिंदे-पवार गट गोत्यात, भाजपही ४ हात लांब - सुषमा अंधारे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 11:34 AM2024-05-30T11:34:34+5:302024-05-30T11:34:50+5:30
भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापासून ४ हात लांब राहात असून कदाचित त्यांना झटकून टाकण्याचाही प्रकार असू शकेल
पुणे : वेगवेगळ्या कारणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट गोत्यात येत आहे. भारतीय जनता पक्ष त्यामुळेच त्यांच्यापासून चार हात लांब राहात आहे. हा कदाचित त्यांना झटकून टाकण्याचाही प्रकार असू शकेल, असा अंदाज शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. पोर्शे कार अपघात प्रकरणात पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
अंधारे बुधवारी दुपारी पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, भाजपला आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यापासून फारकत घ्यायची असेल. त्यामुळे या दोन्ही गटाची अनेक प्रकरणे निघत आहेत. ती निघत आहेत की काढली जात आहेत?, असा प्रश्न त्यांनी केला. शिंदे व ठाकरे एकत्र येतील, असे भरत गोगावले म्हणत असतील तर तो त्यांचा आशावाद आहे, मला तरी तशी सुतराम शक्यता वाटत नाही, असेही अंधारे म्हणाल्या. पोर्शे कार अपघात प्रकरणाचे सगळे पुरावे मिटवले जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. यापूर्वी ललित पाटील यानेही मी सर्वांची नावे घेईल असे सांगितले होते. आता अजय तावरे हाही मी सर्वांची नावे घेईल, असे सांगत आहे. ललित पाटील प्रकरणाचे पुढे काय झाले? तसेच अजय तावरे याचेही होण्याची शक्यता आहे. त्याच्या जिवाला धोका आहे असे मला वाटते, त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे.
ससूनमधील रक्त चाचणी अहवाल बदलण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीच्या अध्यक्ष डॉ. पल्लवी सापळे यांच्याबद्दल आक्षेप आहेतच. त्यांच्यावरच आरोप आहे, मग त्यांनी केलेली चौकशी मान्य कशी करायची? असा प्रश्न अंधारे यांनी केला.
...तर राजीनामा द्या
डाॅ. अजय तावरे व मंत्रालयाचा ६ वा मजला याचा काय संबंध आहे ते सरकारनेच पाहावे. सहाव्या मजल्यावर मंत्र्यांची दालने असतात. आमदार सुनील टिंगरे यांनी तावरे याला अधीक्षक नेमण्याची शिफारस केली असेल तर तो आधी खोटे का बोलला? हा सगळा गुन्ह्याच्या तपासाचा भाग आहे आणि तो गृहखात्याने करायचा आहे. ते खाते सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या, असेही अंधारे म्हणाल्या.