लोकसभा निवडणुकीसाठी पुणे काँग्रेसकडून विविध समित्या स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 11:16 AM2019-03-25T11:16:42+5:302019-03-25T11:19:55+5:30
उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी प्रचाराचे नियोजन केले जात आहे.
पुणे : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून विविध समित्या स्थापन करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने बैठका घेतल्या आहेत. त्यानुसार प्रचार, वक्ते, आघाडी समन्वय, सोशल मीडिया, जाहिरनामा अशा विविध समित्या बनविल्या आहेत. या समित्यांमध्ये जुन्या-नव्यांना संधी देत निवडणुकीत आघाडी घेण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत.
निवडणुकीच्या नियोजनाच्या तयारीसाठी रविवारी काँगेस भवन येथे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन, उल्हास पवार, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, आबा बागुल, नीता रजपूत, रशिद शेख, सदानंद शेट्टी, गोपाळ तिवारी, अजित दरेकर, दत्तात्रय गायकवाड, डॉ. सतिश देसाई, दत्ता बहिरट, काका धर्मावत, अविनाश बागवे, लता राजगुरू, मनिष आनंद, वैशाली मराठे, रफिक शेख, विशाल मलके, सोनाली मारणे, भुषण रानभरे, शिवाजी केदारी आदी उपस्थित होते. बागवे यांच्यासह डॉ. महाजन व उल्हास पवार यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीमध्ये विविध समित्यांची माहिती दिली. प्रचारासाठी पक्षाच्या आदेशानुसार विविध समित्या गठित केल्या आहेत. विधानसभा निहाय प्रमुख व निरिक्षक नेमले आहेत. विधानसभा प्रमुख व निरिक्षकांकडून विधानसभा मतदार संघातील ब्लॉक कमिटी व वॉर्ड कमिटीची बैठक घेतली जाईल. त्यांच्या बुथमधील माहिती घेऊन त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबविणार आहे. जाहिरनामा, सभांसह सोशल मीडियावरही भर दिला जाणार आहे, असे बागवे यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेला उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार यावेळी केला.
-
उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी प्रचाराचे नियोजन केले जात आहे. वक्ते, सभा ठरविणे, सोशल मीडियाचा वापर, जाहीरनामा तयार करणे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील समन्वय यांसह विविध समित्या स्थापन केल्या आहेत. त्याला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाईल.