पुणे : सध्या पुण्यात कोरोनामुळे काही डायलेसिस युनिट्स बंद आहेत. त्यामुळे किडनीचा आजार असलेल्या रुग्णांची गैरसोय होत आहे. पुण्यात २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या किडनी सपोर्ट ग्रुपकडून मदतीचा हात दिला जात आहे. त्यांची इतर डायलिसिस सेंटरमध्ये सोय करून देण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. पुण्यातील दवाखान्यांनी निर्जंंतुकीकरणाचा पर्याय अवलंबून रुग्णांची गैरसोय टाळावी, अशी मागणी केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून अनेक दवाखाने किंवा डायलिसिस सेंटर सध्या बंद केली जात आहेत. त्यामुळे तिथे नियमित डायलेसिस करून घेणा?्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली आहे. डायलेसिस वेळेत न केल्यास रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे किडनी सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून घाबरलेल्या रुग्णांशी संपर्क साधणे, त्यांना धीर देणे, इतर ठिकाणी सोय करण्याच्या दृष्टीने प्रयत्न अशी पावले उचलली जात आहेत, अशी माहिती सपोर्ट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अरुण देवगावकर यांनी 'लोकमत'ला दिली.ते म्हणाले, 'सगळ्या दवाखान्यांमध्ये डायलेसिसची शेड्यूल्स फिक्स असतात. आदर्श प्रमाण ५ तासांचे असले तरी एक डायलेसिस किमान ३.५ ते ४ तास तरी करावेच लागते. त्यामुळे कितीही इच्छा असली तरी नव्या लोकांना सामावून घेणे दवाखान्यांना अवघड जात आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. सेंटर बंद न करता निजंर्तुकीकरण करून घेणे, जास्त त्रास होत असलेल्या रुग्णांना प्राधान्य देणे असे उपाय अवलंबले जाणे गरजेचे आहे. काही ठिकाणांहून या धडपडीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. रुग्णांच्या मदतीसाठी रुग्णालयांनी पुढे यायला हवे. या क्षेत्रातील माजी व आजी डॉक्टर्स, टेक्निशियन व इतर स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. आता रुग्णही एकमेकांना माहिती पुरवत आहेत.'डायलिसिसच्या रुग्णांनी काहीही समस्या उदभवल्यास किडनी सपोर्ट ग्रुपशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णांसाठी संवाद मेळावे, तज्ञांची व्याख्याने, शंका निरसन चर्चासत्र, किडनीचा आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना, सवलतीच्या दरात नियमित तपासण्या असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. डायलिसिस सेंटरमधील मनुष्यबळ कमी झाले असल्याने आणि कोरोनाबाबत भीती वाढत असल्याने रुग्णांमध्ये घबराट निर्माण झाली आहे, असे निरीक्षणही देवगावकर यांनी नोंदवले.
पुण्यात कोरोनामुळे अनेक डायलिसिस सेंटर बंद;रुग्णांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 5:01 PM
कितीही इच्छा असली तरी नव्या लोकांना सामावून घेणे दवाखान्यांना अवघड पुण्यातील दवाखान्यांनी निर्जंंतुकीकरणाचा पर्याय अवलंबून रुग्णांची गैरसोय टाळावी.
ठळक मुद्देमदतीसाठी किडनी सपोर्ट ग्रुपचा पुढाकारपुण्यातील दवाखान्यांनी निर्जंंतुकीकरणाचा पर्याय अवलंबून रुग्णांची गैरसोय टाळावी