पुणे: राज्यात गुन्हेगारीचे अनेक प्रकार घडताहेत, पण कोणावरही कसलीही कारवाई होत नाही. राज्याला गृहमंत्री आहेत की नाही अशी स्थिती असल्याची टीका माजी मंत्री शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली. ठाकरे यांनी सोमवारी पुण्यातील मानाच्या तसेच महत्वाच्या गणेश मंडळांना भेट देत आरती केली.
पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, आनंदाश्रमात ठाण्यामध्ये जे काही झाले तेच ते बाहेरही करत असतात. आनंदाश्रमात झाले ते वाईट झाले. तिथे केलेली कारवाई ही तोंडदेखली कारवाई आहे. कोणावरही कसलीही कारवाई करायची नाही असेच त्यांचे धोरण आहे. प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराला अवमानकारक बोलणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली का? पुण्यात आज ते आहे म्हणतात, तर आजच जिल्ह्यात तीन ठिकाणी गोळीबार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच या राज्याला गृहमंत्री आहेत का असा प्रश्न पडतो.
विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला विचारले जाते, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? त्याचा निर्णय होईल, पण महायुती गद्दारीचा, भ्रष्टाचाराचा चेहरा घेऊन निवडणुकीला सामोरी जात आहे, त्याचे काय? असा प्रश्न ठाकरे यांनी केला.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे व अन्य पदाधिकारी ठाकरे यांच्यासमवेत होते. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळालाही ठाकरे यांनी भेट दिली. त्यानंतर शहरातील मानाचे तसेच अन्य महत्वाच्या गणपती मंडळात जाऊन त्यांनी गणपतीची आरतीही केली.