-अटी व नियमांमुळे मात्र काहींच्या पदरी निराशा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना आपत्तीत पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांना आरोग्य विम्याचा (मेडिक्लेम) मोठा आधार मिळाला आहे़ तर काहींच्या पदरी मात्र मेडिक्लेम असूनही निराशा आली. मेडिक्लेम काढताना प्रारंभी अटी व नियम याकडे दुर्लक्ष करून विम्याचे हप्ते भरले गेल्याने, उपचार खर्चाच्या तुलनेत निम्मीच रक्कम मिळणे, तथा उपचारापूर्वीच कंपनीला न कळविल्याने कॅशलेस उपचार नाकारणे आदींमुळे काहींच्या पदरी निराशा आली.
शहरातील बहुतांशी खासगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांचे बिल विमा कंपन्यांनी अदा केले आहेत. यामध्ये साधारणत: ५० ते ६० टक्के विमा दावे हे कॅशलेस झाले असून, उर्वरित दावे हे रुग्णालयात बिल भरल्यावर सदर बिले विमा कंपनीला सादर केल्यावर मिळाले आहेत़
-------------
मोफतचा विमा पडला महागात
कोणती महागडी इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन खरेदी अथवा अन्य खरेदीबरोबर मिळालेला आरोग्य विमा घातकी ठरल्याची उदाहरणे शहरात दिसून आली असून, एका वस्तूच्या खरेदीबरोबर नाममात्र रक्कमेत वर्षभराचा आरोग्य विमा उतरविणाऱ्या अनेकांना याचा मोठा फटका बसला आहे़
पुण्यातील एका मध्यवर्ती भागातील रुग्णालयात कोरोनावरील उपचार घेतल्यावर संबंधित रुग्णालयाचे बिल विमा कंपनीला सादर केले असता, संबंधित रुग्णाला एक वर्ष झाले तरी बिलाची रक्कम अदा केली गेली नाही़ इलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना त्यांना दोन लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळाला होता़ गेली चार वर्षे ते नियमित ऑनलाईनव्दारे विम्याचा हप्ताही भरत होते़ परंतु, प्रत्यक्षात परताव्याची वेळ आल्यावर कुठलाही एजंटमध्ये नसल्याने केवळ ऑनलाईन अर्ज करणे, कॉल सेंटरच्या माध्यमातून कंपनीकडे तक्रार यामुळे संबंधित रुग्णाला एक वर्षानंतर हाती काहीच आले नसल्याचेही आढळून आले आहे़
--------------------
नियम व अटी पाहूनच विमा उतरावा
आरोग्य विमा उतरविताना नाममात्र रकमेत वर्षाचा तीन-चार लाखांचा तुमच्या कुटुंबाचा आरोग्य विमा उतरविला जाईल, असे नागरिकांना सांगितले जाते़ मात्र, विमा उतरविताना संबंधित व्यक्ती त्या कंपनीचे नियम व अटी पूर्णपणे वाचत नाही़ याचा फटका विमा रकमेचा परतावा घेताना अनेकांना बसतो़ यामध्ये उपचारासाठी दाखल झाल्यावर कोणता वार्ड घ्यावा, कुठल्या औषधांचे पैसे मिळणार नाहीत, याची माहिती कंपनीने देऊनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो़ त्यामुळे आरोग्य विमा उतरविताना प्रथम त्या कंपनीचे सर्व नियम व अटी पाहूनच आरोग्य विमा काढावा जेणे करून नंतर पश्चात्तापाची वेळ येणार नाही़
डॉ़ बबन साळवे, जनरल फिजिशियन
------------------------