पुणे: प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन केल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विविध गटांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आंबेडकर यांनी एमआयएम सोबत ही आघाडी केली आहे व त्यामुळे काँग्रेसने त्यांना महाआघाडीत घ्यायला होकार दर्शवलेला नाही. रिपाईचे वेगवेगळे गट आंबेडकर यांच्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (जयभीम) गटाचे संस्थापक अॅड. प्रकाश भोसले यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांनाच काही प्रश्न विचारले आहेत. त्यात प्रामुख्याने वंचित विकास आघाडीचे उमेदवार येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा एबी फार्म भरणार या प्रश्नाचा समावेश आहे. वंचित विकास आघाडीने भारिपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करावा असे बहुतेक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. वंचित विकास आघाडी किंवा अन्य कोणत्याही नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला तर भारिपचे अस्तित्वच राहणार नाही अशी त्यांची तक्रार आहे. याचबरोबर आंबेडकरांनी मार्क्सवादाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असेही भोसले यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुवादाबरोबरच मार्क्सवादही नाकारला आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी म्हणूनसुद्धा मार्क्सवाद्यांबरोबर जाणार नाही असे जाहीर करावे अशी मागणी भोसले यांनी केली आहे. या दोन गोष्टींची समाधानकारक उत्तरे मिळाल्यास रिपाई (जयभीम) वंचित बहुजन आघाडीला त्वरीत पाठिंबा जाहीर करेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रकाश आंबेडकरांमुळे रिपाईचे अनेक गट ‘ तळ्यात मळ्यात ’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 5:12 PM
आंबेडकर यांनी एमआयएम सोबत आघाडी केली आहे व त्यामुळे काँग्रेसने त्यांना महाआघाडीत घ्यायला होकार दर्शवलेला नाही.
ठळक मुद्देआंबेडकरांनी मार्क्सवादाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी