पुणे : महाराष्ट्रात विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सर्व पक्ष चुरशीची लढत देण्यासाठी सज्ज आहेत. राज्यात वरिष्ठ नेत्यांच्या सभांचे आयोजनही करण्यात आले आहे. तसेच पक्षप्रमुखांचे जिल्हा दौरेही सुरु झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीमहायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा बरोबरच त्यांची पुण्यातही सभा होणार असल्याची माहिती खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली आहे.
मोहोळ म्हणाले, महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. पुण्यात त्यांची १२ नोव्हेंबरला सभा होणार आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा प्रत्येक ठिकाणी २, २ सभा होतील असा आता तरी अंदाज आहे. नाराज नेत्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय, त्याबाबत हे नेते ऐकतील का? असे विचारले असता मोहोळ म्हणाले, आम्ही भाजप संघटना शेवटी एक परिवार म्हणून काम करतो. त्यात जो नाराज आहे. ज्याला संधी नाही मिळाली. अशा कार्यकर्त्यांना आमच्या पक्षाचे नेते घरी जाऊन भेटतात. एका परिवाराप्रमाणे त्याला वागणूक दिली जाते. म्हणून आमची जगातील सर्वोत्तम संघटना आहे. आमच्या छोट्या कार्यकर्त्यांपासून सगळ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. आमची ती संस्कृती आहे. आमच्या राज्यातले तिन्ही नेते एकनाथ शिंदे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी अडीच वर्षे महाराष्ट्राची सेवा केली. त्यांनी नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. नाराज नेत्यांना फडणवीस यांनी फोनही केले. त्यामुळे महायुतीत कुठंही बेबनाव झालं असं चित्र तुम्हाला पुढील काही दिवसात दिसणार नाही. स्वाभाविक आहे की, नेत्याला संधी नाही मिळाली कि नाराजी येते. पण आम्हाला विश्वास आहे की, या तीन नेत्यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रात सर्व सुरळीत होईल.