पुणे : निगडी प्राधिकरणात सब डिव्हिजन ऑफिसर असल्याची बतावणी करुन इनोव्हा व फॉर्चुनर अशा गाड्या भाड्याने घेऊन एका तोतयाने तब्बल ११ लाख ६० हजार रुपयांना एका व्यावसायिकाला गंडा घातला. तसेच जुन्या गाड्या स्वस्तात देतो, असे सांगून त्याने अनेकांकडून अॅडव्हान्स घेऊन फसवणूक केली. पनवेल येथे एका मुलीला फसविल्याच्या प्रकरणात अटक केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
तुषार मारुती थिगळे (वय २८, रा. मुंबई) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी नवाज बाबु देशमुख (वय ३०, रा. खराडी) यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार सप्टेंबर २०१९ ते ११ मार्च २०२० दरम्यान घडला.
तुषार थिगळे याने महाराष्ट्र शासनाचे बनावट ओळखपत्र तयार करुन निगडी प्राधिकरण येथे सब डिव्हिजन ऑफिसर असल्याचे सांगून गाडी भाड्याने घेतली. सुरुवातीला पैसे देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर लॉकडाऊन व वेगवेगळी कारणे सांगून भाडे देण्यास टाळाटाळ करुन ११ लाख ६० हजार रुपयांचे भाडे न देता फसवणूक केली. तसेच गोकुळ पवार, दादा पठारे, पंकज मोरे यांना जुन्या गाड्या स्वस्तात देतो, असे सांगून अॅडव्हान्स पैसे घेऊन फसवणूक केली. प्रशांत जगताप, विशाल हुलुले यांना रेल्वेत नोकरी लावतो, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन फसवणूक केली. पनवेल पोलिसांनी थिगळे याला अटक केल्याचे समजल्यानंतर फसवणूक झालेल्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक अब्दुलकरीम सय्यद अधिक तपास करीत आहेत.