पुणे: आज पत्रलेखन करणं अत्यंत दुर्मिळ झाले आहे. आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पत्रलेखन करता येत नाही. नीट लिहिता येत नाही. पत्रलेखन पुन्हा करता यावे म्हणून टपाल विभागाने खास ‘ढाई आखर’ नावाने पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात सर्वांना पत्रलेखन करता येणार असून, त्यासाठी हजारो रूपयांची पारितोषिक ठेवली आहेत.
भारतीय टपाल विभागातर्फे राष्ट्रीय पातळीवर ‘ढाई आखर’ या शीर्षकाखाली ‘लेखनाचा आनंद-डिजिटल युगात पत्रांचे महत्त्व’ या विषयावर पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह इतर कोणत्याही बोलीभाषेत पत्र लिहिता येणार आहे. यासाठी अठरा वर्षांपर्यंत आणि खुला गट असे दोन विभाग आहेत. स्पर्धेसाठी लागणारे अंतर्देशीय पत्रे आणि लिफाफे स्पर्धकांना जवळील टपाल कार्यालयात मिळतील. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ डिसेंबर आहे. विजेत्यांना राज्य पातळीवर अनुक्रमे २५ हजार, १० हजार आणि ५ हजार, तर केंद्रीय पातळीवर ५० हजार, २५ हजार आणि १० हजार अशी पारितोषिके ठेवली आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण विभागाचे अधिक्षक बी. पी. एरंडे यांनी दिली.
नागरिकांनी पत्र लिहून सर्व पत्रे हे मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई : ४०००१ या पत्त्यावर पाठवायची आहेत. अधिक माहितीसाठी टपाल कार्यालय किंवा www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर संपर्क करावा. यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एरंडे यांनी केले.
नागरिक पुन्हा पत्रलेखनाकडे वळावेत, यासाठी टपाल विभागाने ही स्पर्धा आयोजित केली. मोबाईलच्या जगात पत्रलेखन नाहीसे झाले असले तरी त्याचा वापर करत राहावा, म्हणून ही स्पर्धा आहे. यातून अनेकांना जुना पत्रलेखनाचा काळ आठवले. त्यांच्या आठवणी जाग्या होतील. पत्रलेखनाची परंपरा पुन्हा सुरू होईल.- बी. पी. एरंडे, अधिक्षक, पुणे ग्रामीण टपाल विभाग