पुणे : काश्मीरला पर्यटनासाठी गेलेल्या अनेक पर्यटकांशी माझा संपर्क व बोलणे झाले आहे. अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर पर्यटकांना आपापल्या गावी जायचे आहे. मात्र, प्रवासाचा तिकीट दर वाढवण्यात आल्याने अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत. हे पर्यटक सुखरूप घरी पोहचावेत, यासाठी सरकारने व्यवस्था करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच ही वेळ नफा कमावण्याची नाही तर समाजिक बांधिलकी जपण्याचे आहे आणि संकटात सापडलेल्यांना संकटातून बाहेर काढण्याची आहे, याचा विचार वाहतूक क्षेत्रातील संस्था आणि कंपन्यांनी करावा, असेही त्या म्हणाल्या.
काश्मीरमधील पहलगाम येथे आठ ते दहा दहशतवाद्यांनी मंळवारी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तसेच काही जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे पर्यटनासाठी काश्मीरला गेलेल्या पर्यटकांमध्ये व त्यांच्या नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पर्यटनासाठी गेलेले पर्यटक परत येत असून, ज्यांनी जाण्याचे बुकिंग केले आहे, ते आपले बुकिंग रद्द करत आहेत.
खा. सुळे म्हणाल्या, काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी माझे बोलणे झाले आहे. त्यांनी तिकिटांचे दर वाढल्याने परत येण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सरकारने यावर तोडगा काढून त्या पर्यटकांना सुखरूप घरी पोहचवण्यासाठी विमान, रेल्वे व इतर साधनांचा वापर करावा. ही वेळ नफा कमावण्याची नाही, तर त्यांना सुखरूप घरी पोहचवण्याची आहे. याबाबत मी स्वत: केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी चर्चा केली आहे.
हल्ल्यासंदर्भात पंधरा दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती, अशा बातम्या पाहण्यात येत आहेत. त्यामध्ये किती तथ्य आहे, याबद्दल कल्पना नाही. मात्र, पंतप्रधान व देशाच्या गृहमंत्र्यांनी घटनेची माहिती घेऊन सर्वपक्षीय बैठक बोलवावी. हल्ल्यासंदर्भात सत्य स्थिती देशातील सर्व नागरिकांना व संसदेला द्यावी. आत्ताची वेळ राजकारण करण्याची नाही, राजकारण करायला नंतर खूप वेळ आहे. आता जे संकटात आहेत, त्यांना त्यातून बाहेर काढण्याची गरज आहे. यामध्ये सुरक्षा व्यवस्था व गुप्तचर विभागाचे अपयश समोर आले, तर आम्ही संसदेत सरकारला प्रश्न विचारू, पण आता टीकाटीप्पणी व आरोप करण्याची वेळ नाही, असेही खा. सुळे म्हणाल्या.