नसरापूर : सर्वत्र जंगलं भुईसपाट करण्याची जणू स्पर्धा सुरू आहे. ज्यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत आहे. पर्यावरण वाचवण्याचे जे काही प्रयत्न सुरू आहेत, ते तोकडे आहेत. पण पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येणारे अनेकजण आहेत हेही नसे थोडके, असे प्रतिपादन माजी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत कदम यांनी नसरापूर येथे स्वर्गारोहण शिडी (तिरडी) लोकार्पण प्रसंगी केले.
पुण्यातील माहेश्र्वरी समाजबांधव आणि दलाल कुटुंबीयांनी नसरापूर ग्रामपंचायत व अग्निहोत्र सेवा मंडळ यांना वजनाने हलक्या व स्टीलच्या दणकट अशा दोन स्वर्गारोहण शिड्या भेट दिल्या.
निसर्गातील बांबू तोडून मयतीच्या वेळी वापर केल्याने पर्यावरण समतोल बिघडत आहे. याकरिता वृक्षांची तोड होऊ नये यासाठी नवीन बदल स्वीकारणे गरजेचे आहे, असे डॉ. शाम दलाल यांनी मांडलेली संकल्पना सत्यात आल्याने समाधान व्यक्त केले.
या वेळी यशवंत कदम, डॉ. शाम दलाल, दत्तात्रय वाल्हेकर, विजय जंगम, नसरापूरचे उपसरपंच गणेश दळवी, सदस्य संदीप कदम, नामदेव चव्हाण, अनिल शेटे, नंदकुमार राजे उपस्थित होते. अग्निहोत्र मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी मनाचे श्लोक पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.
नागरिकांना मयत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी या स्वर्गारोहण शिडीचा जास्तीत जास्त उपयोग होईल व नागरिकांनी या स्वर्गारोहण शिडीचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन दत्तात्रय वाल्हेकर यांनी केले.
अंत्यविधीमध्ये तिरडीसाठी लाकडी बांबूंचा वापर केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बांबूची तोड होते व पर्यावरणाचा ऱ्हास होतो. हे टाळण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत श्री माहेश्वरी परिवार व नसरापूर येथील डॉ. श्याम दलाल परिवाराच्या वतीने शव वाहण्यासाठी (तिरडी) स्टीलचे स्टॅन्ड तयार केले असून, ते नसरापूर ग्रामपंचायत व सामाजिक संस्था अग्निहोत्र सेवा मंडळ यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
नसरापूर (ता. भोर): अंत्यविधीसाठी पर्यावरणपूरक स्टीलचे स्टॅन्ड (तिरडी) ग्रामस्थांकडे प्रदान करताना डॉ. श्याम दलाल.