पुणे : सतरा वर्षे भारती लष्करात सेवा दिलेल्या माजी सैनिकाच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्युपश्चात त्याची हाडे दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या अभिमानास्पद निर्णयामुळे अनेकांना जीवनदान मिळणार आहे. ससून रुग्णालयाच्या डाॅक्टरांमुळे हे दान शक्य झाले आहे.
अवयवदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. समाजात आता अवयवदानाबाबत हळूहळू जागरुकता निर्माण हाेत आहे. परंतु हाडांच्या दानाबाबत फारशी जागरुकता दिसून येत नाही. पुण्यात राहणारे माजी सैनिक विजय कदम (वय 49) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले हाेते. त्यांच्या कुटुंबियांना अवयव दानाचे महत्त्व सांगितल्यानंतर त्यांनी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी इतरही अवयव दान करण्यास तयार असल्याचे सांगितले. तेव्हा नेत्रदान समुपदेशिका मनिषा पांढरे यांनी याबाबतची माहिती माेहन फाऊंडेशनच्या आकाश साळवे यांना दिली. त्यानंतर त्यांनी कुटुंबियांना हाडे दानाचे महत्त्व सांगितल्यानंतर कुटुंबियांनी कदम यांची हाडे दान करण्याचा देखील निर्णय घेतला.
कदम यांची काही हाडे ही मुंबईतील टाटा मेमाेरिअल हाॅस्पिटलच्या बाेन बॅंकेकडे सुपूर्त करण्यात आली. पार्थिव विद्रुप हाेणार नाही याची काळजी घेत हाडे काढण्यात आली. याविषयी माहिती देताना झेडटीसीसीच्या पुण्याच्या वरीष्ठ प्रत्याराेपन प्रतिनिधी आरती गाेखले म्हणाल्या, दान करण्यात आलेली हाडे ही ज्यांची कॅन्सरमुळे तसेच इतर इन्फेक्शनमुळे हाडे काढून टाकण्यात आली आहेत त्यांच्या शरीरात प्रत्याराेपन करण्यात येणार आहे.
माेहन फाऊंडेशनचे प्रकल्प प्रमुख जया जयराम म्हणाल्या, अनेकदा हाडे दान करण्याबाबत आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर पार्थिव विद्रुप हाेण्याची त्यांना भिती असते. नेत्रदानाबाबात नागरिकांमध्ये जागृती झाली असली तरी त्वचा आणि हाडांच्या दानाबाबत समाजात फारशी जागरुकता नसल्याचे दिसून येते.