फायलींचा प्रवासाची होणार प्रत्येक टप्यावर नोंद : कामाचा वेग वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हा परिषदेच्या कामाचा दर्जा वाढवण्यासाठी आणि कामात सुसूत्रता आणण्यासाठी आता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे त्यांच्याकडे असणारे काम आणि फाईलींचे आता मॅपिंग होणार आहे. फायलींच्या प्रवासाची प्रत्येक टप्प्यावर नोंद ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील फायलीची निर्गती किती दिवसात आणि कोणत्या टप्प्यावर केली याचीही ऑनलाईन नोंद होणार आहे. या कार्यपद्धतीमुळे फायलींचा प्रवास जलद गतीने होणार असून प्रलंबित कामाबद्दल संबंधितांना जबाबदार धरले जाणार असून येत्या महिनाभराच्या अवधीमध्ये ही प्रणाली जिल्हा परिषदेत कार्यान्वित केली जाणार आहे.
अनेक कर्मचाऱ्यांना आपण नेमके काय काम करतो त्याची कार्यपद्धती त्याचे नियम निकष तसेच अधिकारी याबद्दलची कोणतीही कल्पना नसते. जवळपास ८० टक्के पेक्षा जास्त कर्मचारी यापूर्वी या पद्धतीने काम झाले आहे त्याच पद्धतीने फायलीं पुढे पाठवत होते. मात्र, आता प्रत्येक कर्मचार्याला तो करत असलेले काम हे कोणत्या निकष आणि नियमात आहे, याबद्दल त्यांना माहिती देण्यासाठी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रामार्फत सध्या मार्गदर्शन केले जात आहे. जिल्हा परिषदेमध्ये गेल्या शनिवार आणि रविवारी दोन दिवस याबद्दल विशेष मोहीम घेण्यात आली.
याबत माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, जिल्हा परिषद कामकाजामध्ये मॅपिंग कार्यपद्धती येत्या महिनाभरात सुरू होईल. त्यासाठी सध्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि आनुषंगिक बाबींची माहिती दिली जात आहे. या कार्यपद्धतीमुळे प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्याकडील फाईल च्या कामाचे टप्पे आणि दिवस निश्चित करून दिले जातील. विषय समित्यांच्या संदर्भात एक महिन्याची मुदत असेल. अन्य कामासाठी कार्यपद्धती आणि तिचा वेळ प्रत्येक टप्प्यावर ठरवण्यात आला आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मॅपिंग च्या नियमानुसार जिल्हा परिषदेमधील प्रशासकीय कामकाज सुरू होईल.
कामाच्या पद्धतीत होणार आमूलाग्र बदल
कामाच्या फायली प्रलंबित ठेवणे किंवा त्याचा वेळेवर निपटारा न झाल्याने अनेक प्रशासकीय प्रश्न निर्माण होतात. कर्मचाऱ्यांना आपण काय काम करतो याची नीटशी माहिती नसते. प्रथा-परंपरा कार्यपद्धती तसेच पूर्वी या पद्धतीने काम झाले म्हणून तसेच काम सुरू ठेवण्याचा पायंडा प्रशासनात दिसून येतो. मात्र, आता मॅपिंग सिस्टीम बरोबरच प्रत्येकाला कामाची जबाबदारी त्याच्या कामाचे नियम याबद्दलची परिपूर्ण माहिती संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे असेल. त्याच पद्धतीने निर्धारित वेळेत फायलींचा प्रवास पूर्ण करण्याची जबाबदारी देखील निश्चित होणार आहे.