पिंपरी : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने 'महाराष्ट्र बंद' पुकारण्यात आला आहे. या बंदमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून हिंजवडी आयटी क्षेत्रातील नोकरदार, अभियंते यांना काही कंपन्यांनी आजचा दिवस घरातूनच काम करावे असा पर्याय दिला आहे. वर्क फ्रॉम होम हा पर्याय असल्याने आयटीयन्सनी घरी बसूनच काम करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये इंटरनेट सुविधा सुरू आहे. कंपनीची महत्वाची कामे आयटीयन्सनी घरूनच करत आहेत. एरवी सकाळी गजबजून जाणाऱ्या हिंजवडी, वाकड येथील रस्त्यावर आज वाहनाची गर्दी कमी आहे. मावळ आणि खेड तालुक्यात इंटरनेट सुविधा बंद असल्याने त्याचा परिणाम आजूबाजूच्या औद्योगिक क्षेत्रावर जाणवला. तळवडे सॉफ्टवेअर टेकनोलॉजी पार्क परिसरात इंटरनेट सुविधेत व्यत्यय येत आहे.
तळेगाव तसेच निगडी चाकण मार्ग बंद ठेवण्यात आल्याने अन्य पर्यायी मार्गावर वाहतुकीचा ताण आहे. हिंजवडीत एकूण 120 छोट्या-मोठ्या कंपन्या असून साडेतीन लाख कर्मचारी काम करतात. या सर्वांवर आजच्या बंदचा परिणाम जाणवत आहे. बहुतांश कंपन्या बंद आहेत तर काही कंपन्यांनी 'वर्क फॉर होम'चा पर्याय अवलंबला आहे. पिंपरी-चिंचवडमधील महापालिकेच्या 131 शाळा बंद आहेत. 20 खासगी महाविद्यालये बंद आहेत. पुणे-मुंबई जुना महामार्गावर शुकशुकाट आहे. रावेत, वाल्हेकरवाडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, कासारवाडी येथे दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.