पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात गुरुवारी (2 ऑगस्ट) सकाळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर, कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनाची सुरुवात ही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर ठिय्या देऊन झाली. या आंदोलनाची कल्पना असल्याने बापट यांच्या कसबा गणपतीजवळील कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनानंतर स्वतः बापट यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी बापट यांनी आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली.
सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं. जर या विषयावर घाईने निर्णय घेतला तर न्यायालयात हे आरक्षण टिकणार नाही. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये अशी विनंतीही त्यांनी कार्यकर्त्यांना केली. यानंतर काही वेळा राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार आहे.