लोणावळा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गुरुवारी (26 जुलै) सकाळी साडेआठ वाजता मावळ तालुक्यातील कान्हेफाटा याठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे. मावळ तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मावळ तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे. स्थानिक व्यावसायिकांसह शाळा, महाविद्यालये, दुकानदार यांनी या बंदला उस्फुर्त पाठिंबा दिला आहे.
लोणावळा, कार्ला, कामशेत, कान्हेफाटा, वडगाव, तळेगाव, देहूरोड, पवनानगर या महत्वाच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करण्याकरिता जमणार आहेत. कळंबोली येथे बुधवारी घडलेल्या हिंसक घटनेच्या पार्श्वभुमीवर आंदोलन शांततेमध्ये करण्याचे आवाहन मावळच्या समन्वय समितीने केले आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता खबरदारी घेण्यात आली आहे. बंदच्या पार्श्वभुमीवर आज सकाळपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थंडावली असून अतिशय तुरळक वाहने रस्त्यावर पहायला मिळत आहेत.
कान्हेफाटा पाटोपाट कार्ला एकविरा देवीच्या मंदिराकडे जाणार्या मार्गाजवळ मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांच्या वतीने कार्ला फाटा येथे रास्ता रोको करत महाराष्ट्र शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवे, मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यत नोकरी भरती प्रक्रिया रद्द करावी ही मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. रास्ता रोकोमुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली होती. लोणावळा शहरात आरक्षणाच्या मागणीकरिता सर्व बाजारपेठा बंद ठेवत मोर्चा काढण्यात आला आहे.